देशभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय रेल्वेच्या ऑल इंडिया टिकीट चेकिंग स्टाफ ऑर्गनायझेशनतर्फे पंतप्रधान सहाय्यता निधीला 15 लाख 77 हजार 765 रुपयांची देणगी देण्यात आली.
ऑल इंडिया टिकीट चेकिंग स्टाफ ऑर्गनायझेशनतर्फे आज सोमवारी सकाळी सदर मदतीचा धनादेश पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व बेळगावचे खासदार सुरेश अंगडी हेदेखील उपस्थित होते. भारतीय रेल्वेच्या सर्व डिव्हिजन्स, झोन्स, सेक्शन्स आदींमध्ये काम करणाऱ्या ऑल इंडिया तिकीट चेकिंग स्टाफ ऑर्गनायझेशनच्या सर्व सदस्यांनी वैयक्तिकरित्या जमा केलेली 15,77, 765 रुपयांची मदत पंतप्रधान सहाय्यता निधीला देऊ केली आहे हे विशेष होय.
यासंदर्भात बोलताना ऑल इंडिया तिकीट चेकिंग स्टाफ ऑर्गनायझेशनचे सुनील आपटेकर म्हणाले की, देशावर कोरोनाचे जे संकट आले आहे, त्यावर मात करण्यासाठी आमच्या संघटनेचे सदस्य देखील आघाडीवर राहून काम करत आहेत. लॉक डाऊनच्या काळात आम्ही गरीब गरजू हमाल व कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले आहे. स्थलांतरित यांसाठी जी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे, ती रेल्वे सेवा सुरळीत पार पाडण्यासाठी आमच्या संघटनेचे सदस्य कार्यरत आहेत. आमचे कार्य देखील एखाद्या कोरोना वाॅरियर प्रमाणेच सुरू आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी आमच्यात प्रत्येकाच्या पगारातून वर्षभर दरमहा ठराविक रक्कम कापली जाणार आहे. याव्यतिरिक्त आम्ही वैयक्तिकरित्या पंतप्रधान सहाय्यता निधीला 15,77,765 रुपयांची मदत करत आहोत याचा आम्हाला अभिमान आणि देशासाठी आपण काहीतरी करतोय याचे मानसिक समाधान देखील आहे, असे सुनील आपटेकर यांनी सांगितले.
सामाजिक बांधिलकी जपत ऑल इंडिया तिकीट चेकिंग स्टाफ ऑर्गनायझेशनचे या पद्धतीने पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत करणे ही प्रशंसनीय बाब असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी सांगितले. याप्रसंगी तिकीट चेकिंग स्टाफ ऑर्गनायझेशनचे स्थानिक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.