एखाद्या विचाराने माणूस झपाटून गेला तर त्याचे संपूर्ण आयुष्य त्या विचारा भोवतीच फिरत असते. ही गोष्ट बेळगावचे छायाचित्रकार रवी होंगल यांच्या बाबतीत देखील घडली असून रवि होंगल यांना फोटोग्राफीने इतके झपाटले आहे की “कॅनॉन, निकॉन व ईप्सन” हे त्यांचे जीवन आहे आणि “सोनी” त्यांचे हृदय आहे. गोंधळून जाऊ नका, सोनी हे त्यांच्या शास्त्रीनगर येथील घराचे नांव आहे, तर कॅनॉन, निकॉन व ईप्सन (आधार कार्डनुसार खरी) ही त्यांच्या मुलांची नांवे आहेत.
लहानपणापासून कॅमेराबद्दल आकर्षण असणाऱ्या रवी होंगल यांचे शिक्षण फारसे झालेले नसले तरी कॅमेराद्वारे आपण जीवनात कांहीतरी करू शकतो यावर त्यांचा प्रबळ विश्वास होता. प्रारंभीच्या काळात ते ग्रामीण भागात जाऊन पेनटॅक्स आणि झिनीट कॅमेर्याच्या सहाय्याने छायाचित्रे काढत होते.
त्यानंतर अल्पावधीत यांनी आपला स्टुडिओ सुरू केला आणि त्याला आपली पत्नी राणी यांचे नांव दिले. रवी होंगल यांना फोटोग्राफीचा प्रचंड ध्यास असल्यामुळे त्यांनी शास्त्रीनगर येथे जो बंगला बांधला तो देखील कॅमेरा सारखा दिसणारा आहे. विश्वास ठेवा हे खरं आहे. होय! एक बंगला बने कॅमेरा की तरह.
आपली आवड आपल्या व्यवसायात आणि घरगुती जीवनात उत्तम प्रकारे जपणे ही गोष्ट सर्वसामान्य नाही. अगदी बोटावर मोजता येतील इतक्या लोकांना ते शक्य झालेले आहे. परंतु होंगल कुटुंबांनी मात्र आपली आवड उत्तम प्रकारे जपली आहे.