खासबाग येथील बसवेश्वर सर्कल येथे निराधार आणि बिकट परिस्थितीत जीवन जगणाऱ्या, थंडीवाऱ्यात कुडकुडत पडलेल्या “त्या” वृद्ध इसमाला महाद्वार रोडचे सुप्रसिद्ध रक्तदाता संजय पाटील यांच्या प्रयत्नामुळे अखेर नावगे रोडवरील “करूणालय” वृद्धाश्रमांमध्ये आश्रय मिळाला आहे.
बसवेश्वर सर्कल खासबाग येथे काही दिवसांपूर्वी क्षीरसागर नांवाचा एक वृद्ध इसम थंडीवाऱ्यात कुडकुडत निराधार अवस्थेत पडला होता. त्याची दयनीय अवस्था पाहून महाद्वार रोडचे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते व सुप्रसिद्ध रक्तदाते संजय पाटील यांनी म. ए. युवा समिती कार्यकर्ते विजय जाधव, किरण हुद्दार व परशराम अनगोळकर यांच्या मदतीने त्या वृद्धाची शहापूर येथील माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांच्या सिद्धार्थ बोर्डिंगमध्ये निवासाची तात्पुरती सोय करून दिली होती. यावर समाधान न मानता त्या वृद्धाची कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था करण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील होते.सदर वृद्धाला आसरा देण्यास बऱ्याच जणांनी नकार दर्शविला.
संजय पाटील व युवा समितीच्या कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांना नुकतेच यश आले. जेंव्हा नावगे रोडवरील “करूणालया” या वृद्धाश्रमाच्या चालकांनी निराधार क्षीरसागर या वृद्धास आपल्या संस्थेत कायमस्वरूपी आसरा देण्याची तयारी दर्शवली.
तेंव्हा संजय पाटील यांच्यासह विजय जाधव किरण हुद्दार व परशराम अनगोळकर यांनी क्षीरसागर या वृद्धाला आज शुक्रवारी करूणालयामध्ये नेऊन दाखल केले. याप्रसंगी खासबाग व्यापारी गणेशोत्सव मंडळाचे कृष्णा हलगेकर, बंडू बामणे, अमोल शिंदे, महेश नाईक, जितेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.