दरवर्षी पावसाळ्यात कॅम्प येथे ग्लोब टॉकीजनजीक खानापूर रोडवर पाण्याचे मोठे तळे साचून रहदारीस अडथळा निर्माण होत असतो. यासंदर्भात दरवर्षी वेळोवेळी तक्रार करूनही अद्यापपर्यंत त्याची दखल घेतली जात नसल्याने नागरिक विशेष करून वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात ग्लोब टॉकीजनजीक खानापूर रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास तेथील वैज्ञानिक ड्रेनेज व्यवस्था प्रामुख्याने कारणीभूत आहे. यासंदर्भात बोलताना कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य रिझवान बेपारी म्हणाले की, खानापूर रोड हा शहरातील वाहतुकीचा मुख्य मार्ग आहे. या मार्गावर वाहनांची सतत मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावर ग्लोब टॉकीजनजीक पाण्याचे मोठे तळे निर्माण होण्याची जी समस्या निर्माण होते. त्यावर उपाययोजना करून ही समस्या कायमची निकालात काढावी, अशी आम्ही संबंधित खात्याकडे वारंवार तक्रारवजा मागणी केली आहे. तथापि अद्यापपर्यंत आमच्या मागणीची दखल घेण्यात आलेली नसल्याचे सांगितले.
लॉक डाऊन पूर्वी जेंव्हा स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. त्यावेळी मी आणि कॅम्प येथील काही नागरिकांनी ग्लोब टॉकीज नजीकच्या रस्त्याचे काम थांबविले. तसेच त्याठिकाणची रस्त्यावर पाणी तुंबण्याची समस्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. संबंधित भागातील ड्रेनेजची व्यवस्था फार जुनी असून त्यामुळेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते, तेंव्हा कृपया रस्त्याचे काम करण्यापूर्वी प्रथम त्याठिकाणची ड्रेनेजची व्यवस्था तात्काळ नीट करा, अशी विनंती आम्ही केली होती.
आमच्या विनंतीला मान देऊन संबंधित अधिकाऱ्यांनी प्रथम आम्ही ड्रेनेजचे काम करून घेऊ आणि त्यानंतर रस्त्याची करू असे सांगून या रस्त्याचे काम थांबले देखील होते. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आणि सदर प्रकार आमच्या लक्षात येईपर्यंत या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. यामुळेच पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी तुंबण्याची समस्या अद्यापही कायम असल्याचे ही रिझवान बेपारी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या संदर्भात स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता आमच्याकडे संबंधित ठिकाणची देण्याची व्यवस्था खराब झाले असल्याची तक्रार कोणीही केली नव्हती. त्यामुळे आम्ही रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. तथापि आता तुम्ही ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. तेंव्हा या संदर्भात लवकरच आम्ही योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले असल्याचे रिझवान बेपारी यांनी सांगितले.