Tuesday, December 24, 2024

/

“या” स्लम बोर्ड कॉलनीला कोणी वाली आहे का?: रहिवासी जगताहेत कष्टप्रद जीवन

 belgaum

सात-आठ महिने घरात विज नसेल, पिण्याचे पाणी येत नसेल तर आपले जीवन कसे होईल हा विचार न केलेलाच बरा. परंतु हे प्रत्यक्षात घडत आहे. कणबर्गी गावानजीकच्या सागरनगर स्लम बोर्ड अपार्टमेंट्स या कॉलनीतील नागरिकांना उद्यापर्यंत कोणत्याही मूलभूत नागरी सोईसुविधा उपलब्ध नसल्याने त्यांचे जीवन मोठे कष्टप्रद झाले आहे.

सामाजिक व आर्थिक दृष्ट्या कमकुवत लोकांना निवारा आणि मूलभूत नागरी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य सरकार विविध गृहनिर्माण योजना राबवत आहे. परंतु या योजनांमुळे लोकांची सोय होण्याऐवजी त्यांची गैरसोय होऊन त्यांना कष्टप्रद जीवन जगावे लागत असेल तर या योजनांचा काहीच फायदा नाही. गृहनिर्माण योजनेचा मूळ उद्देश असफल झाल्याचे चित्र सागरनगर स्लम बोर्ड अपार्टमेंट (एसएनएसबी) या कॉलनीत पहावयास मिळते. या कॉलनीमध्ये एकूण 20 इमारती असून तीनशेहून अधिक घरे आहेत. या सर्वांचीच अवस्था सध्या दयनीय झाली आहे याठिकाणी सुमारे 150 कुटुंबे वास्तव्यास असून या सर्वांनाच मूलभूत नागरी सोयीसुविधांच्या अभावामुळे गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

सदर कॉलनीतील रहिवासी असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी विष्णू इंगळे या प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, एसएनएसबीए कॉलनीतील बहुतांश रहिवासी हे झोपडपट्टीवासीय आहेत. हातावर पोट असणाऱ्या या लोकांना दिवसभर राबल्यानंतरच पोटाला खायला मिळते. ही परिस्थिती असताना येथे राहण्यास आलेल्या दिवसांपासून त्यांच्या घरात वीज नाही किंवा पिण्याचे पाणी येत नाही. अशा अवस्थेत ते कसे जगत असणार विचार करा. या संदर्भात लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करून देखील अद्यापही त्याची दखल घेण्यात येत नसल्याचे लक्ष्मी इंगळे यांनी सांगितले.

Needs devlop coloney
Needs devlop coloney city limits

सदर कॉलनीतील लोकांना सर्व मूलभूत नागरी सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी सामाजिक कार्यकर्त्या या नात्याने लक्ष्मी इंगळे सातत्याने झटत असतात. वीज पुरवठ्याची सोय नसल्यामुळे रात्रीच्यावेळी या कॉलनीमध्ये अंधाराचे भयावह साम्राज्य पसरलेले असते. घरातील जेवणखाण वगैरे कामे मुलांचा अभ्यास हे सर्व कांही मेणबत्तीच्या प्रकाशात करावे लागते. पथदीप ही नसल्यामुळे रात्रीचे ये-जा करणे कठीण जाते. कॉलनीतील रहिवाशांना 300 मीटर अंतरावरून चार दिवसातून एकदा पिण्याचे पाणी आणावे लागते. इतक्या दुरून पाणी आणले तरी इमारतीतील चौथ्या ते पाचव्या मजल्यापर्यंत ते पाणी घागर, कळशा, बादल्या अथवा पाण्याच्या प्लास्टिक कंटेनरमधून घेऊन जाणे कष्टाचे असते. वयोवृद्ध नागरिक आणि गर्भवती महिलांसाठी तर हे काम अधिकच कष्टाचे ठरत असल्याचे सुरेश मादार यांनी सांगितले.

एसएनएसबीए कॉलनीनजीक मोठ्याप्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले असतात त्यामुळे अस्वच्छता निर्माण होऊन दुर्गंधीचे वातावरण पसरले असते. या ठिकाणच्या कचऱ्याची उचल करण्याकडे संबंधित खाते साफ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप लक्ष्मी इंगळे यांनी केला. दरम्यान, एसएनएसबीए कॉलनीतील समस्यांबाबत स्लम बोर्डच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता काही अपरिहार्य कारणास्तव या कॉलनीतील विकासकामे थांबली आहेत. तथापि येत्या आठवड्याभरात एसएनएसबीए कॉलनीतील समस्या दूर करण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.