कोरोनाविषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन कायदा कार्यकारी समितीने परराज्यातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांच्या रजिस्ट्रेशन अर्थात नोंदणीसंदर्भात सोमवार दि 15 जून 2020 रोजी नवा एसओपी आदेश जारी केला आहे.
सदर आदेशातील नव्या एसओपीनुसार काॅरन्टाईन निकष पुढील प्रमाणे असतील. ए) महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांसाठी 7 दिवसाचे इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन अधिक 7 दिवसाचे होम काॅरन्टाईन, बी) दिल्ली व तामिळनाडू राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी तीन दिवसांचे इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन अधिक 11 दिवसांचे होम काॅरन्टाईन , सी) इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी मात्र 14 दिवसांचे होम काॅरन्टाईन. डी) व्यवसायिक प्रवासी स्थलांतरित प्रवासी आणि खास श्रेणीतील प्रवाशांसाठी आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने यापूर्वी जारी केलेल्या नियमांप्रमाणे निकष लागू असतील.
सेवा सिंधू पोर्टल रजिस्ट्रेशन (नोंदणी) : ए) कर्नाटकात येणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा कर्नाटक मार्गे स्थलांतर करणाऱ्यांसाठी त्यांच्या संपर्क क्रमांक आणि मुक्कामाच्या ठिकाणच्या पत्त्याची अचूक माहिती असणारी सेवा सिंधू पोर्टल नोंदणी अनिवार्य असणार आहे, बी) विमान कंपन्या रेल्वे आणि रस्ते प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व कंपन्यांनी त्यांच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सेवा सिंधू पोर्टलवर आपली रीतसर नोंदणी केली आहे की नाही याची प्रवासाला प्रारंभ होण्यापूर्वी खात्री करून घेणे आवश्यक आहे.
काॅरन्टाईन नियमांचा कोणत्याही प्रकारे भंग अथवा सेवा सिंधू पोर्टलवर नोंदणी नसणे किंवा कर्नाटकात येणाऱ्या व्यक्तीने चुकीची माहिती देणे किंवा प्रवासी वाहतूक कंपनीकडून सेवा सिंधू पोर्टलवर रीतसर नोंदणी नसलेल्या प्रवाशाची वाहतूक करणे हा गुन्हा असेल. यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 (बी) आणि भादवी 188 कलमान्वये दंडात्मक कारवाई केली जाईल, असे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन कायदा कार्यकारी समितीचे मुख्य सचिव आणि चेअरमन टी. एम. विजय भास्कर यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद आहे.