कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या आंतरराज्य मार्गदर्शक सूचीनुसार कर्नाटकात 48 तासांपेक्षा कमी वेळ वास्तव्यास येणाऱ्या व्यावसायिक प्रवाशांना काॅरंटाईन आणि कोरोना तपासणी माफ असणार आहे.
राज्य सरकारने आंतरराज्य प्रवास यासंदर्भात गेल्या 26 जून रोजी जाहीर केलेली मार्गदर्शक सूची पुढीलप्रमाणे आहे. परराज्यातील प्रवाशांचे विमान अथवा रेल्वेचे परतीचे तिकीट आगमन झालेल्या दिवसापासून 7 दिवसानंतरचे नसावे. रस्ते मार्गाने येणाऱ्यांनी कर्नाटकात ज्यांना भेटण्यास येत आहोत त्यांच्या पत्त्याचा पुरावा सादर करणे आवश्यक असेल. व्यवसायिक अभ्यागत जर 48 तासाच्या अल्प वास्तव्यासाठी (आलेल्या वेळेपासून) आलेले असतील तर त्याला अथवा तिला कोरोना तपासणी आणि काॅरंटाईन माफ असेल, जर संबंधित व्यक्ती 48 तासांपेक्षा जास्त आणि सात दिवसांपेक्षा कमी दिवस राज्यात राहणार असेल तर त्या व्यक्तीचे आगमनानंतर तात्काळ स्वॅबचे नमुने घेतले जातील आणि तपासणी अहवाल येईपर्यंत संबंधिताला इन्स्टिट्यूश्नल काॅरंटाईन व्हावे लागेल. संबंधित व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आला तर अशी व्यक्ती आपले नियोजित काम उरकून परत आपल्या गावी गावी जाऊ शकते. परराज्यातील प्रवाशांकडे जर आगमनाच्या दोन दिवस आधीचा कोरोना मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचा निगेटिव्ह अहवाल असेल तर अशा प्रवाशांना कोरोना तपासणी व काॅरंटाईन मधून वगळले जाईल. तसेच त्यांचे हॅन्ड स्टॅम्पिंगही केले जाणार नाही.
कर्नाटकातून इतर राज्यात जाणारे प्रवासी प्रस्थानाच्या दिवसापासून जर 4 दिवसात पुन्हा परत येणार असतील तर त्यांची कोरोना तपासणी अथवा काॅरंटाईन केले जाणार नाही. तथापि चार दिवसानंतर पुन्हा परत येणाऱ्यांना काॅरंटाईन शिष्टाचार पाळावा लागेल. त्यांचे हॅन्ड स्टॅम्पिंग केले जाणार नाही.
विमान किंवा रेल्वेने येणाऱ्या स्थलांतरित प्रवाशांचे कर्नाटकातून पुढील प्रस्थानाचे तिकीट आलेल्या एक दिवसापेक्षा जास्त दिवसानंतरचे नसावे. रस्ते मार्गाने राज्यात येणाऱ्या प्रवाशांनी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणाच्या पत्त्याचा पुरावा आणि ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. प्रवाशांनी कर्नाटकातून बाहेर जाताना सीमेवरील ठराविक चेकपोस्ट / रेल्वे स्टेशन अथवा विमानतळ या ठिकाणी आपल्या प्रस्थानाची नोंद करावी. रस्ते मार्गे स्थलांतरित होणाऱ्यांच्या हातावर “स्थलांतरित प्रवासी” असा शिक्का मारला जाईल.
कर्नाटकात येणाऱ्या सर्व प्रवाशांनी सेवा सिंधू पोर्टलवर स्वयम् नोंदणी करणे अनिवार्य असेल. पोर्टलवर त्यांनी आपले नांव, पत्ता आणि मोबाईल नंबरची माहिती द्यावी. व्यवसायिक प्रवाशांनी नांव, मोबाईल नंबर आणि कर्नाटकात ज्याला भेटणार त्या व्यक्तीचा पत्ता आणि परतीची तारीख याची माहिती द्यावी. स्थलांतरित प्रवाशांनी कर्नाटकातून बाहेर पडण्याच्या ठिकाणी आपल्या मुक्कामाच्या राज्यातील पत्ता द्यावा.
काॅरंटाईन नियम : परराज्यातील रोगलक्षणात्मक व्यक्तींसाठी कोवीड-19 सेवा केंद्रांमध्ये सात दिवसांचे हॉस्पिटल आयसोलेशन, आगमनानंतर तात्काळ तपासणी, पॉझिटिव्ह अहवाल आल्यास मान्यताप्राप्त कोवीड हॉस्पिटलमध्ये रवानगी, अहवाल निगेटिव्ह आल्यास कोणतीही तपासणी नाही.
रोगाची लक्षणे नसलेल्या महाराष्ट्रातून आलेल्या प्रवाशांसाठी 7 दिवसांचे इन्स्टिट्यूश्नल काॅरंटाईन आणि 7 दिवसांचे होम काॅरंटाईन असेल. (विमान आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी देखील हा नियम लागू असेल.) संबंधितांमध्ये रोगाची लक्षणे आढळली तरच कोरोना तपासणी केली जाईल.
गर्भवती महिला, 10 वर्षाखालील मुले, 60 वर्षावरील वयोवृद्ध, गंभीर आजारी अथवा कुटुंबातील व्यक्तीचे निधन झालेल्या खास श्रेणीतील रोगाची लक्षणे नसलेल्यांचे एका सहाय्यकासह काॅरंटाईन केले जाईल. आगमनानंतर 5 ते 7 दिवसात त्यांची तपासणी केली जाईल. महाराष्ट्र वगळता इतर राज्यातून येणाऱ्यांसाठी 14 दिवसांचे होम काॅरंटाईन असणार आहे.