माजी महापौर सरिता पाटील यांच्या प्रयत्न व पुढाकारामुळे शहरातील लेंडी नाल्याच्या साफसफाईची मोहीम बेळगाव महापालिकेने आज मंगळवारी सकाळपासून हाती घेतली आहे. त्याचप्रमाणे गेल्या दोन दिवसातील मुसळधार पावसामुळे काल शहरातील लेंडी नाला फुटला. याबाबतचे “बेळगाव लाइव्ह”ने प्रसिद्ध केलेले वृत्त हे देखील ही मोहीम सुरू होण्यामागचे मुख्य कारण आहे.
गेले दोन दिवस होत असलेल्या पावसामुळे बेळगाव शहरातील गटारी, ड्रेनेज व नाले तुंबले आहेत. यापूर्वी नाला सफाईची मागणी करून देखील महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले होते. परिणामी गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळे शहरातील गटारी, ड्रेनेज व नाल्यातील पाणी रस्त्यावर आले होते. बेळगाव शहरातील महत्वाच्या नाल्यांपैकी लेंडी नाला हा कालच्या पावसामुळे फुटला देखील होता. माजी महापौर सरिता पाटील यांच्यासह शेतकरीवर्ग गेल्या अनेक दिवसांपासून या लेंडी नाल्याची दुरुस्ती व साफसफाई करण्याची मागणी करत होता. सरिता पाटील यांनी तर महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांना आठ दिवसापूर्वी यासंदर्भात निवेदनही दिले होते.
काल हा नाला फुटल्यामुळे सरिता पाटील यांच्या मागणीची दखल मनपाला घ्यावी लागली आणि हा नाला जेथून सुरू होतो त्या कोनवाळ गल्ली येथून आज मंगळवारी सकाळी नाला सफाईची मोहीम सुरू झाली. यासाठी हिताची जेसीबीचा वापर केला जात आहे. नाला सफाई च्या कामावर स्वतः सरिता पाटील आपल्या सहकाऱ्यांसमवेत जातीने लक्ष ठेवून आहेत.
याआधी माजी महापौर सरिता पाटील यांच्या प्रयत्नांमुळे महिन्याभरापूर्वी सदर नाल्याची साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. तथापि नाल्याच्या ठिकाणी जेसीबी रुतून बसत असल्यामुळे ही स्वच्छता मोहीम बारगळली होती. त्यानंतर कोनवाळ गल्ली परिसरातील लेंडी नाल्याच्या सफाईसंदर्भात सविता पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. गेल्या दोन दिवसातील मुसळधार पावसामुळे काल शहरातील लेंडी नाला फुटला. याबाबतचे वृत्त “बेळगाव लाईव्ह” ने प्रसिद्ध करताच खडबडून जाग्या झालेल्या महापालिकेला अखेर माजी महापौर सरिता पाटील यांच्या मागणीची दखल घ्यावी लागली. महापालिकेने आज मंगळवारपासून लेंडी नाला सफाईची मोहीम हाती घेतल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.