कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन यंदाची दहावीची परीक्षा शिक्षण खात्याने निश्चित केलेल्या केंद्रांमध्ये न घेता त्या – त्या शाळांमध्ये घ्यावी, अशी विनंती बेळगाव उत्तरचे आमदार अॅड. अनिल बेनके यांनी राज्याचे शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांच्याकडे केली आहे.
राज्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री सुरेश कुमार हे आज मंगळवारी बेळगाव दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी त्यांची बेळगाव सरकारी विश्रामधाम येथे भेट घेऊन उपरोक्त विनंती केली. या भेटीप्रसंगी आमदार बेनके यांनी शिक्षण मंत्र्यांशी आगामी दहावीच्या परीक्षेच्या नियोजनासंदर्भात चर्चा केली. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाची दहावीची परीक्षा त्या-त्या शाळांमध्येच घेणे मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने उचित ठरणार आहे. पूर्वीप्रमाणे केंद्राच्या ठिकाणी ही परीक्षा घेतल्यास विविध भागातील परीक्षार्थी एका ठिकाणी येतील ज्यामुळे संसर्गाचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. मुलांची दहावीची परीक्षा त्यांच्या – त्यांच्या शाळेमध्ये घेतल्यास सर्व मुले परिचयाचे असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने ते सुरक्षेचे ठरेल. याठिकाणी पर्यवेक्षक मात्र बाहेरील शाळांचे ठेवण्यात यावेत ज्यामुळे कॉपी सारख्या गैरप्रकाराला आळा बसेल, असे आमदार ॲड अनिल बेनके यांनी शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांना सांगितले.
सॅनीटायझेशनच्या बाबतीत कसे काय? या आमदार बेनके यांच्या प्रश्नाला उत्तर देताना शिक्षण मंत्र्यांनी दोन दिवस आधी सर्व परीक्षा केंद्रांचे सॅनीटायझेशन केले जाईल असे सांगितले. त्याचप्रमाणे सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार परीक्षार्थीना परीक्षा द्यावी लागेल असेही स्पष्ट केले. इंग्रजी अद्याक्षरानुसार दहावीची परीक्षा घेतली जाते. तथापि त्या – त्या शाळांमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भातील आपल्या सूचनेचा जरूर विचार केला जाईल, असे आश्वासनही शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी आमदार बेनके यांना दिले.
Hi best acivement horld work my aim