घातक कोरोना विषाणूने आता कर्नाटकाच्या राजकीय क्षेत्रात देखील प्रवेश केला आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर यांचे वडील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अवघ्या एक दिवसाच्या आत मंत्र्यांची पत्नी आणि कन्येला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुदैवाने सुधाकर आणि त्यांच्या दोन मुलांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
काल सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर यांचे वडील पीएन केशव रेड्डी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सिद्ध झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे त्यानंतर आज मंगळवारी सकाळी 7.06 वाजता मंत्री सुधाकर यांनी ट्विटरद्वारे आपली पत्नी व मुलीला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट केले आहे. माझ्या कुटुंबातील सदस्यांचा कोरोना तपासणी अहवाल हाती आला आहे.
दुर्देवाने माझी पत्नी व कन्येचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मी आणि माझ्या दोन मुलांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सर्वांच्या प्रार्थना आणि शुभेच्छाबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे मंत्री के. सुधाकर यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
गेल्या एप्रिल महिन्यामध्ये एका कोरोना संशयित व्हिडिओ जर्नलिस्टच्या संपर्कात आल्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर स्वतःहून काॅरन्टाईन होणे पसंत केले होते.