गेले दोन दिवस शहराला झोडपलेल्या पावसामुळे गुलमोहराचे एक मोठे झाड उन्मळून रस्त्यावर कोसळल्याची घटना बुधवारी रात्री कॅम्प येथील ऑफिसर्स मेस समोरील तिम्मया रोडवर घडली. रात्रीच्या वेळी फारशी रहदारी नसल्यामुळे सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
गेले दोन दिवस शहरात पाऊस पडत आहे. या पावसामुळे काल बुधवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास कॅम्प येथील तिम्मया रोडवरील ऑफिसर्स मेस समोर असलेले गुलमोहराचे एक मोठे झाड अचानक उन्मळून रस्त्यावर पडले. रात्रीच्या वेळी सदर रस्त्यावर फारशी रहदारी नसते, त्यामुळे अचानक कोसळलेल्या या झाडामुळे सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. सदर झाड कोसळल्याची माहिती नजिकच राहणाऱ्या रंजन शेट्टी यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य साजिद शेख यांना दिली.
झाड कोसळल्याने रहदारी होणारा अडथळा लक्षात घेऊन साजिद शेख यांनी आपला भाऊ साबीर शेख व मुलगा अर्फात शेख यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर कटरच्या सहाय्याने स्वतः साजिद शेख यांनी झाडाच्या बुंध्याचा वरचा भाग व फांद्या कापल्या. या कामी त्यांना साबीर शेख, अर्फात शेख, रंजन शेट्टी व डॉ. जरीर रतनजी यांचे सहकार्य लाभले.
त्यानंतर प्रश्न होता झाडाच्या कापलेल्या मोठ्या अवजड फांद्या रस्त्यावरून हटविण्याचा, तेंव्हा शेख यांनी यासंदर्भात लष्करी अधिकारी कर्नल मनोज शेट्टी यांना फोन लावला. कर्नल शेट्टी यांनी लागलीच 8-10 जवानांना साजिद शेख यांच्या मदतीसाठी धाडले. अखेर साजिद शेख यांनी त्या जवानांच्या मदतीने तोडलेल्या झाडाच्या फांद्या व बुंधा रस्त्यावरून हटवून रात्री सुमारे 11.30 वाजता रस्ता वाहतुकीस खुला करून दिला.
सदर कोसळलेले गुलमोहराचे झाड ज्याठिकाणी होते. त्याला लागूनच रस्त्याशेजारी डॉ. जरीर रतनजी यांचे घर आहे. बुधवारी रात्री कोसळलेले झाड सुदैवाने रस्त्यावर कोसळले म्हणून ठीक झाले अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. दरम्यान मुसळधार पावसासह झाडाच्या क्षमतेपेक्षा फांद्यांचा विस्तार वाढल्याने सदर झाड उन्मळून पडल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य साजिद शेख यांनी “बेळगाव लाईव्ह”ला सांगितले.