श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 343 व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मराठा बँकेच्या मुख्य कार्यालयातील छ. शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनपर तैलचित्र पूजनाचा कार्यक्रम आज शनिवारी पार पडला.
बसवान गल्ली बेळगाव येथील मराठा बँकेच्या कार्यालयात आयोजित सदर कार्यक्रमाप्रसंगी बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांच्या हस्ते शिवरायांच्या तैलचित्राचे पूजन करण्यात आले. यावेळी विलास लाड यांनी जोशपूर्ण ध्येयमंत्रासह छ. शिवाजी महाराजांची आरती म्हंटली. प्रारंभी संचालक बाळासाहेब काकतकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले संचालक शेखर हंडे आणि विनोद हंगीरकर यांच्या प्रयत्नाने मूर्तिकार संजय किल्लेकर यांच्याकडून हे सुबक असे तैल चित्र करवून घेण्यात आले आहे. सदर तैल चित्राची संकल्पना दिपकराव दळवी यांची असल्याचे बाळासाहेब काकतकर यांनी आवर्जून सांगितले.
मराठा बँकेचे नूतनीकरण करताना आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील मार्गदर्शनपर स्फूर्तिदायी प्रसंग बँकेचे कर्मचारी, ग्राहक, भागधारक व इतर नागरिकांना प्रेरणादायी ठरतील या उद्देशाने सदर तैल चित्र उभे केले आहे, असे बँकेचे संचालक दीपक दळवी यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळे बरेच आहेत. परंतु राज्यकारभार कसा चालवावा? त्याचप्रमाणे व्यवहारांमध्ये मराठी भाषेचा योग्य वापर कसा करावा? याचा आदर्श शिवरायांनी आपल्यासमोर ठेवला आहे. सदर चित्राचे काम अजून अपूर्ण असून त्याची पूर्तता झाल्यावर अनावरण समारंभ आयोजित केला जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
सदर कार्यक्रमाप्रसंगी मराठा बँकेच्या व्हा. चेअरमन मीना काकतकर, संचालक बाळाराम पाटील, लक्ष्मणराव होनगेकर, बी. एस. पाटील, रेणू किल्लेकर, मोहन चौगुले, लक्ष्मण नाईक,, बँकेचे जनरल मॅनेजर रविकिरण धुराजी आदींसह बँकेचे कर्मचारी, ग्राहक आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.