कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने कार 29 जून पासून दररोज रात्री 8 ते पहाटे 5 वाजेपर्यंत राज्यव्यापी संचार बंदी लागू केली आहे. या संचार बंदीचा फटका रेल्वे प्रवाशांना बसला असून बेळगाव मार्गे धावणाऱ्या रेल्वेगाड्या रात्रीच्या वेळीच बेळगावात येत असल्यामुळे प्रवाशांना रात्री 8 पूर्वी रेल्वे स्थानकावर येऊन रेल्वेच्या प्रतीक्षेत ताटकळावे लागत आहे.
राज्यात संचार बंदीचा निर्णय घेण्यात आल्यामुळे नागरिकांना रात्री आठ नंतर घराबाहेर पडता येणार नाही. मात्र या नव्या नियमामुळे रेल्वे प्रवाशांचा मात्र गोंधळ उडाला आहे. बेळगाव – बेंगलोर सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वेचे रात्री 9 वाजता बेळगावहून बेंगलोरकडे प्रस्थान होते. या रेल्वेसाठी प्रवाशांना आता एक तास अगोदर रेल्वे स्थानकावर येऊन बसावे लागणार आहे. त्याचप्रमाणे यशवंतपुर – निजामुद्दीन रेल्वे तर रात्री 11.32 वाजता बेळगाव रेल्वेस्थानकावर येत असल्यामुळे प्रवाशांना चक्क साडेतीन तास अगोदर स्थानकावर येऊन ताटकळत बसावे लागणार आहे. हजरत निजामुद्दीन येथून येणारे गोवा एक्सप्रेस रात्री 12.45 वाजता बेळगावला पोचते. त्यामुळे या रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना संचार बंदीमुळे रेल्वे स्थानकाबाहेर पडता येणार नाही. त्यासाठी त्यांना सकाळी 5 वाजेपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
एकंदर संचार बंदीच्या नव्या नियमामुळे रेल्वे प्रवाशांना फटका बसत आहे. ज्यांच्याकडे रेल्वे प्रवासाचे तिकीट आहे त्यांना संचार बंदीमध्ये सवलत दिल्यास त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. तेंव्हा राज्य शासनाने याकडे लक्ष देऊन संचार बंदीमध्ये रेल्वे प्रवाशांना सवलत द्यावी, कशी जोरदार मागणी होत आहे.