गो मासाची वाहतूक करण्यात येत असल्याच्या संशयावरून हिंदुत्ववादी संघटनांकडून वाहने अडवून पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. मात्र कर्ले – बेळवट्टी मार्गावर अज्ञातांनी जनावरांचे मांस वाहतूक करणारे एक वाहन पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी रात्री घडल्याचे आज शनिवारी सकाळी उघडकीस आले.
बेळगावहून गोव्याला गो – मांसाची वाहतूक करण्यात येत असल्याच्या संशयावरून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून काही वाहने अडवून पोलिसांच्या ताब्यात देण्यात येत आहेत. गेल्या आठ दिवसापासून हिंदुत्ववादी संघटनांनी ही मोहीम तीव्र केल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी याकडे दुर्लक्ष होते अवैध मांस वाहतूक सुरू होती.
या परिस्थितीत काल शुक्रवारी रात्री अज्ञातांनी मांस वाहतूक करणारे वाहनच पेटवून दिल्याची घटना कर्ले – बेळवट्टी मार्गावर घडल्याने चर्चेला ऊत आला आहे. आज शनिवारी सकाळी सदर प्रकार उघडकीस येताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.
सदर गाडी गोवा पासिंग असून बेळगाव हुन गोव्याकडे जात होती.याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर घटनेची बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.