श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून सुप्रसिद्ध असलेले शहरातील श्री कपिलेश्वर मंदिर उद्या सोमवार दि. 8 जून रोजी सकाळी 6 वाजल्यापासून भक्तांसाठी खुलं करण्यात येणार आहे.
यापार्श्वभूमीवर आज रविवारी सकाळी संपूर्ण मंदिर सॅनिटाईझ करून कोरोनाला आळा बसावा यासाठी होमहवन, पूजाअर्चना, विशेष धार्मिक विधी देखील करण्यात आले.
शहरातील श्री कपिलेश्वर मंदिर उद्या सोमवारी सकाळ वाजल्यापासून दर्शनासाठी खुले होणार आहे. तथापि तत्पूर्वी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आज रविवारी संपूर्ण मंदिराचे सॅनिटाईझेशन अर्थात निर्जंतुकीकरण करण्यात आले. याखेरीज कोरोना प्रादुर्भावाला आळा बसावा यासाठी मंदिर परिसरामध्ये विशेष होम आयोजित केलेला होता.
या होमाचे पौरोहित्य चिकमंगळूर येथील दत्ताश्रमाचे पिठाधीश पुज्य अशोकजी शर्मा गुरुजी यांनी केले. गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली सर्व धार्मिक विधी पार पडले. मंदिर उद्यापासून खुले होणार या आनंदाप्रीत्यर्थ धार्मिक विधीच्या ठिकाणी भव्य आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली आहे.
याप्रसंगी श्री कपलेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, राजू भातकांडे, सतीश निलजकर, अभिजीत चव्हाण, राहुल कुरणे, विवेक पाटील, विकास शिंदे, राकेश कलघटगी दौलत जाधव आदीं शहरातील मोजके प्रतिष्ठित नागरिक आणि भाविक उपस्थित होते.
मंदिर सॅनिटायझेशनसह धार्मिक विधी पार पाडण्यासाठी मंदिर ट्रस्ट कमिटीच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.आता सोमवार दिनांक आठ पासून मंदिर सुरू करण्यात येत असल्याने भाविक आतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या सर्व परिस्थितीत सुरक्षित अंतर आणि नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी भाविकांनी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.