कंग्राळी खुर्द गावाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर असणारे एपीएमसी भाजी मार्केटचे गेट बंद करून भाजीपाला वाहतूक आतल्या आत सुरु करावी आणि फोडलेल्या आवार भिंतीच्या ठिकाणापर्यंत कंग्राळी गावाकडे जाणारा रस्ता तात्काळ तयार करावा, अशी जोरदार मागणी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांच्यासह कंग्राळी खुर्द आणि पंचक्रोशीतील 25 गावांनी केली आहे.
कंग्राळी खुर्द गावातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी आपली हजारो एकर जमीन बेळगाव एपीएमसी भाजी मार्केट साठी देऊ केली आहे. तथापि या गावाकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आले आहे. गेल्या 40 वर्षांपासून या गावांमध्ये कोणतेही मोठे विकास काम झालेले नाही. या गावाकडे जाणारा रस्ता व्यवस्थित नाही. गेल्या 15 – 20 वर्षापासून कंग्राळी खुर्द गावासाठी चांगला रस्ता तयार केला जावा अशी मागणी केली जात आहे. तथापि अद्यापही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
सध्या या गावाकडे जाणारा जो रस्ता आहे तो दोन्ही बाजूला उताराचा तर आहेच शिवाय या रस्त्याची पार दुर्दशा झालेली आहे. कंग्राळी ग्रामस्थांसह परिसरातील सुमारे 25 गावातील ग्रामस्थ या रस्त्याचा वापर करतात. या रस्त्याची इतकी दुर्दशा झालेली आहे की येथून ये – जा करताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरावा लागतो. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून जाताना वाहन चालक आणि नागरिकांना मोठी कसरतच करावी लागते. खराब रस्त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडत असतात. यासंदर्भात वेळोवेळी संबंधित खात्याकडे तक्रार करून देखील त्याकडे कानाडोळा केला जात आहे.
एपीएमसी प्रवेशद्वाराच्या (गेट) ठिकाणाहून कंग्राळी खुर्द गावासाठी चांगला रस्ता होऊ शकतो. सदर प्रवेशद्वार अर्थात गेट बंद करून भाजी मार्केटमधील भाजी व मालवाहतूक आतल्या आत सुरु करावी. तसेच एपीएमसीची आवार भिंत ज्या ठिकाणी फोडण्यात आली आहे त्या ठिकाणापर्यंत कंग्राळी गावाकडे जाणारा रस्ता तयार करण्यात यावा, अशी समस्त कंग्राळी ग्रामस्थांसह परिसरातील 25 गावातील लोकांची मागणी असल्याचे जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी “बेळगाव लाइव्ह”शी बोलताना सांगितले. कंग्राळीवासियांनी एपीएमसी भाजी मार्केट उभारण्यासाठी आपली हजारो एकर जमीन देऊ केली आहे. खरं तर या गावाला प्रशासनाने प्राधान्याने सर्व त्या नागरी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. मात्र दुर्दैवाने आपल्या गावापर्यंत उत्तम रस्ता व्हावा यासाठी येथील ग्रामस्थांना गेल्या 15 – 20 वर्षापासून झगडावे लागत आहे ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे, असे सरस्वती पाटील म्हणाल्या.
कंग्राळी गावाकडे जाणार्या सध्याची रस्त्याची दुरावस्था पाहता या रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक विशेष करून ज्योतीनगरकडे जाणाऱ्या लोकांचे किती हाल होत आहेत याचा प्रशासनाने विचार केला पाहिजे. वयोवृद्ध मंडळी, लहान मुले, महिला या सर्वांसाठीच हा रस्ता धोकादायक बनत चालला आहे. यासाठी एपीएमसी गेटपासून थेट कंग्राळी गावापर्यंत नव्याने रस्ता तयार करणे गरजेचे आहे. तेंव्हा प्रशासनाने या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून सदर रस्ता निर्मितीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी जि. पं. सदस्य सरस्वती पाटील यांनी केली. हा रस्ता दुपदरी झाला तरी चालेल, असेही त्यांनी सूचित केले.
याप्रसंगी ग्राम सुधारणा कमिटी अध्यक्ष आर. आय. पाटील, ग्रा. पं. सदस्य यल्लापा पाटील, आशा चलवादी, सचिन शिवणगेकर, ज्योतिर्लिंग युवक मंडळाचे मारुती जाधव, सुरेश पाटील, राजू प्रधान, जी. जी. कंग्राळकर, दिनेश पाटील, प्रकाश नाईक, मदन पाटील, राजू जत्ती, पुंडलिक पाटील, पांडुरंग पाटील, बाबू पावशे, पी. डी. पाटिल, शिवाजी जाधव आदींसह कंग्राळी ग्रामस्थ उपस्थित होते.