कर्नाटकातील राज्यसभेच्या चार जागांसाठी येत्या 19 जून रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ लागली असताना भाजप हायकमांडने एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील इराण्णा कडाडी नांवाच्या पक्ष कार्यकर्त्याला राज्यसभेचे तिकीट देऊन जिल्ह्यातील भाजपच्या प्रस्थापित नेत्यांना एक प्रकारचा धक्का दिल्याचे मानले जात आहे.
इराण्णा कडाडी हे पक्षाचे प्रारंभापासूनचे निष्ठावंत कार्यकर्ते मानले जातात. राज्यसभेचे तिकीट आपणास मिळेल याची पुसटशीही कल्पना नसताना पक्ष वरिष्ठांनी एका सर्वसामान्य व निष्ठावानाला राज्यसभेचे तिकीट देऊन प्रामाणिक कार्यकर्त्यांचा एक प्रकारे गौरव केला आहे. इराण्णा कडाडी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असून त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे विधान परिषदेचे तिकीट मागितले होते. मात्र त्यावेळी त्यांना डावलण्यात आले होते. इराण्णा कडाडी हे प्रारंभीच्या काळात तसे खासदार सुरेश अंगडी यांचे विश्वासू कार्यकर्ते मानले जातात. मात्र मध्यंतरी उभयतांमध्ये राजकीय संघर्ष झाल्याने ते त्यांच्यापासून दूर गेले.
यावेळी राज्यसभेच्या निवडणुकीचे तिकीट मिळावे यासाठी खासदार प्रभाकर कोरे व माजी खासदार रमेश कत्ती यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष होता. विशेष म्हणजे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे हे दोघेही अनुयायी समजले जातात. या उभयतांमधील संघर्षामुळे येडियुरप्पा यांची परिस्थिती बिकट झाली होती. त्यामुळे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या कोर कमिटीच्या बैठकीत राज्यसभेच्या तिकीटासाठी कोरे व कत्ती यांची शिफारस करण्यात आली होती. मात्र आश्चर्य म्हणजे कोर कमिटीचा हा निर्णय हाय कमांडने लाथाडून थेट इराण्णा कडाडी यांची निवड करून यापुढे सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यांना न डावलता त्यांचे पक्षातील स्थान अधिक बळकट केले जाईल हा एक नवा आदर्श घालून दिला आहे. तिकीट देताना यापुढे सोम्यागोम्यांना पक्षात स्थान दिले जाणार नाही, हे देखील या निवडीच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. राज्यसभेचे तिकीट देताना फार मोठे आर्थिक व्यवहार आणि वशिलेबाजी होत असते. मात्र त्यालाही यानिमित्ताने फाटा मिळाला आहे. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यात एका सर्वसामान्याला वरिष्ठांनी तिकीट देऊन त्यांनाच एक प्रकारे न्याय दिल्याची भावना निर्माण झाली आहे.
राज्यसभेच्या एकूण चार जागांपैकी भाजपने कोरे व कत्ती यांना डावलून इराण्णा कडाडी यांची निवड केली. त्याचबरोबर दुसऱ्या एका जागेसाठी रायचूरच्या व मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अशोक गस्ती या सर्वसामान्य पक्ष कार्यकर्त्याला तिकीट दिले गेले आहे. या दोन्ही निवडीमुळे राज्यभरातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून अशा घटनांमुळे पक्ष तळापासून अधिक बळकट होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या सर्व नाट्यामागे भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा यांचे चातुर्य दडल्याचे बोलले जात आहे.