राष्ट्रीय महामार्गावर होनगा येथे आज सकाळी भरधाव अज्ञात वाहनाच्या ठोकरीने एक कुत्रे जागीच ठार झाले. या प्रकारच्या घटना महामार्गावर सातत्याने घडत असल्यामुळे या मार्गाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स घातली जावेत, अशी मागणी “हा माझा धर्म” या संघटनेचे सर्वेसर्वा विनायक केसरकर यांनी राष्ट्रीय महामार्ग खात्याकडे केली आहे.
काकती येथील विनायक केसरकर यांनी “हा माझा धर्म” ही सेवाभावी संघटना सुरू केली असून या संघटनेच्या माध्यमातून ते समाजकार्य आणि पशु सेवा करत असतात. विनायक केसरकर यांना आज सकाळी होनगा येथे राष्ट्रीय महामार्गावर एका कुत्र्याचा मृतदेह आढळून आला. भरधाव वाहनाच्या ठोकरीमुळे सदर कुत्रे जागीच ठार झाले होते.
रस्त्यावरील मृत बेवारस प्राण्यांची कलेवरं उचलण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने एका पथकाची नेमणूक केली आहे. तब्बल चार तास वाट पाहून देखिल हे पथक न आल्यामुळे शेवटी विनायक केसरकर यांनी स्वतःच त्या मृत कुत्र्याचे कलेवर उचलून रस्त्याशेजारी ठेवले.
राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडताना आपण दोन्ही बाजूने एखादे वाहन तर येत नाही ना याची प्रथम खात्री करून घेतो आणि त्यानंतर रस्ता ओलांडतो. परंतु मुक्या प्राण्यांच्या बाबतीत हा प्रकार लागू होत नाही. परिणामी राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वाहनांखाली सापडून अनेक मोकाट प्राण्यांचा मृत्यू होत असतो. हा प्रकार टाळण्यासाठी महामार्गाच्या दुतर्फा बॅरिकेड्स घालावेत, अशी मागणी विनायक केसरकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रीय महामार्ग खात्यासह खुद्द पंतप्रधान कार्यालयाकडे ही पत्र पाठविले आहे. विनायक केसरकर हे सामाजिक कार्य तर करतातच, याखेरीज त्यांनी आत्तापर्यंत विविध प्रकारच्या जवळपास 700 प्राण्यांना जीवदान दिले आहे.