राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृत्यूची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर येत्या 25 जूनपासून सुरू होणारी एसएसएलसी परीक्षा स्थगित करण्यात यावी यासाठी राज्य सरकारवर पालक, शिक्षणतज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षाकडून देखील वाढता दबाव येत आहे.
इतर राज्यांनी पालकांच्या चिंतेचे गांभीर्य लक्षात घेऊन शालेय बोर्डाची परीक्षा स्थगित केली असताना कर्नाटक राज्य सरकार मात्र ही परीक्षा घेण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे निरीक्षकांना दिसून आले आहे. गेल्या 10 दिवसात बेंगलोर शहरासह राज्यात कोरोनाचा संसर्ग सर्रास वाढला आहे. सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 9,399 इतकी झाली असून सोमवारी एकाच दिवशी 249 रुग्ण आढळून आले शिवाय 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात अलीकडेच 27 हजार विद्यार्थ्यांनी पीयूसी द्वितीय वर्षाच्या इंग्रजी विषयाची परीक्षा दिली. या परीक्षेप्रसंगी कोरोनासंदर्भातील सोशल डिस्टंसिंग आदी नियमांचे जे उल्लंघन झाले ते पाहता एसएसएलसी विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या मुलांचा जीव धोक्यात घालण्याची इच्छा नाही. आम आदमी पक्षाचे नेते मोहन दासरी यांनी राज्य सरकारकडून मुलांवर जबरदस्तीने ही परीक्षा लादली जात असल्याचा आरोप केला आहे.
*परीक्षा रद्द करा – एचडीके*
दरम्यान, माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी एसएसएलसी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले असून राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने सर्वप्रथम योग्य त्या उपाययोजना कराव्यात. यासंदर्भात शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांनी गांभीर्याने विचार करावयास हवा. सध्याची परिस्थिती अत्यंत नाजूक असून या परिस्थितीत योग्य निर्णय घेणे ही त्यांची जबाबदारी आहे, असे कुमारस्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.