शहर उपनगरातील अन्यायकारक घरपट्टी वाढीच्या विरोधात माजी नगरसेवक संघटनेने उठवलेल्या आवाजाला यश आले असून महापालिका आपल्या अधिकारातील घरपट्टी वाढ कमी करेल, असे ठोस आश्वासन जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आपल्याला दिले असल्याची माहिती माजी नगरसेवक संघटना बेळगावचे अध्यक्ष ॲड. नागेश सातेरी यांनी “बेळगाव लाईव्ह”ला दिली.
बेळगाव महापालिकेकडून जी अवास्तव अन्यायकारक घरपट्टी वाढ करण्यात आली आहे त्याचा सर्व थरातून निषेध केला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांसह सर्वांचाच या घरपट्टी वाढीला तीव्र विरोध आहे. ही अन्यायकारक घरपट्टी वाढ रद्द केली जावी. मुळात कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉक डाऊनमुळे कोसळलेले आर्थिक संकट लक्षात घेऊन यावेळची घरपट्टी माफ केली जावी, अशी मागणी केली जात आहे. यासंदर्भात बेळगावच्या माजी नगरसेवक संघटनेने सातत्याने आवाज उठवून महापालिकेसह जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पालक मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.
माजी नगरसेवक संघटनेतर्फे अध्यक्ष माजी महापौर ऍड नागेश सातेरी, मालोजी अष्टेकर, शिवाजी सुंठकर आदींचा समावेश असणाऱ्या माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आज सोमवारी सकाळी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची भेट घेऊन पुन्हा अवास्तव घरपट्टी वाढीचा मुद्दा उपस्थित केला. त्या वेळी बोलताना पालकमंत्री जारकीहोळी यांनी यासंदर्भात नगरविकास खात्याला कळविण्यात आले असून महापालिका आयुक्तांनाही सूचना करण्यात आली आहे.
नगरविकास खाते आपला जो कांही निर्णय असेल तो लवकरच जाहीर करेलच मात्र दरम्यान बेळगाव महानगरपालिका आपल्या अखत्यारीत जितकी होईल तितकी घरपट्टी वाढ कमी करेल, असे ठोस आश्वासन जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाला दिले आहे.