Tuesday, November 19, 2024

/

माजी नगरसेवकांनी का दिलाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रहाचा इशारा

 belgaum

महानगरपालिका हद्दीतील घरपट्टी वाढ तात्काळ मागे घेण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी जर येत्या दोन-तीन दिवसात माजी नगरसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह केला जाईल, असा इशारा माजी नगरसेवक संघटना बेळगावचे अध्यक्ष माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांनी दिला आहे.

बेळगाव महानगरपालिकेच्या अन्यायी घरपट्टी वाढी संदर्भात माजी नगरसेवक संघटना बेळगावतर्फे आज सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार होते. परंतु जिल्हाधिकाऱ्यांसह कोणीच जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्यामुळे शहरातील माजी नगरसेवक संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना जिल्हाधिकारी कार्यालय आवारात खोळंबून राहावे लागले होते. याप्रसंगी “बेळगाव लाइव्ह”शी बोलताना ॲड. नागेश सातेरी यांनी उपरोक्त इशारा दिला. अन्याय कारक घरपट्टी वाढ मागे घ्यावी, यासंदर्भात जिल्हा पालकमंत्री यांसह सर्वांकडेच वारंवार अर्ज विनंत्या करूनही अद्यापही कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याबद्दल माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांनी खेद व्यक्त केला. कर्नाटकात 11 महानगरपालिका आहेत, त्यापैकी 10 महानगरपालिकांकडून कचरा विल्हेवाट लावण्यासाठीचा टॅक्स गोळा केला जात नाही.

Ex corporator association
Ex corporator association

फक्त बेळगाव महानगरपालिका हा टॅक्स गोळा करत असून हा बेळगावच्या जनतेवर अन्याय आहे. तेंव्हा सर्वप्रथम मी याचा निषेध करतो असे सांगून ॲड. सातेरी पुढे म्हणाले की, बेळगाव महापालिकेने जी पंधरा टक्के घरपट्टी वाढ केली आहे. त्यापैकी पाच टक्के वाढ कमी केली जावी, असे केल्यास सध्या लॉक डाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला दिलासा मिळणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशाद्वारे घर मालकांनी भाडेकरूंकडून भाडे वसूल करू नये अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगितले आहे. आता सद्य वाढीव घरपट्टी पाहता आम्ही सर्वजण भाडेकरूच्या पातळीवर आलो आहोत. कारण ही वाढीव घरपट्टी आम्हाला परवडणारी नाही. तेंव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी याची तात्काळ गांभीर्याने दखल घ्यावी. त्याचप्रमाणे येत्या दोन-तीन दिवसात घरपट्टी वाढ कमी करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी माजी नगर सेवक संघटनेला निमंत्रित करावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले जाईल, असे माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांनी स्पष्ट केले.

माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दर तीन वर्षाला अशाप्रकारे घरपट्टी वाढ झाली तर आम्हाला एक दिवस आमची घरे विकावी लागतील, असे सांगून वाढीव घरपट्टी भरण्यास तीव्र विरोध दर्शविला. हुबळी धारवाड महानगरपालिकेने वाडी घरपट्टीचा आपला निर्णय मागे घेतला आहे. यावरून स्थानिक प्रशासकीय पातळीवर घरपट्टी संदर्भातील निर्णय घेतला जाऊ शकतो हे स्पष्ट आहे. तेंव्हा स्थानिक मंत्री, आमदार आणि प्रशासनाने चर्चा करून तात्काळ घरपट्टी वाढ कमी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

याप्रसंगी माजी महापौर विजय मोरे, मालोजीराव अष्टेकर, शिवाजी सुंठकर, सरिता पाटील, माजी उपमहापौर धनराज गवळी, रेणू किल्लेकर, माया कडोलकर, सतीश गौरगोंडा, संजीव प्रभू, संभाजी चव्हाण, राजकुमार मूर्कीभावी, कल्लापा प्रधान, संजय शिंदे, रणजीत चव्हाण -पाटील, राजन हुलबत्ते आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.