वड्डर गल्ली, अनगोळ येथील ड्रेनेजची पाईपलाईन तुंबून मेनहोलद्वारे सांडपाणी ओसंडून वाहत असल्यामुळे रस्त्यावर सर्वत्र घाण व दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून हे ड्रेनेज स्वच्छ करून तात्काळ दुरुस्त करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
वड्डर गल्ली, अनगोळ येथील ड्रेनेजची पाईपलाईन तुंबून मेनहोलद्वारे सांडपाणी रस्त्यावर ओसंडून वाहत असल्याचा हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. ड्रेनेजमधील सांडपाणी, घाण, मैला, केरकचरा आदी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे अस्वच्छता तर निर्माण झालीच आहे शिवाय वडर गल्ली परिसरात प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांच्या विशेषकरून लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना या परिसरात सध्या डेंग्यू आणि मलेरियाची साथ देखील आली आहे. या पार्श्वभूमीवर वड्डर गल्लीतील ड्रेनेज ओव्हरफ्लो होण्याचा हा प्रकार स्थानिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ओव्हरफ्लो झालेल्या या ड्रेनेजबद्दल वारंवार तक्रार करून देखील अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नाही. सदर ड्रेनेज तुंबून ओव्हरफ्लो होण्याचा हा प्रकार गेल्या दीड वर्षापासून सुरू असून याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्यामुळे वड्डर गल्ली परिसरात तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. तक्रारी करून कंटाळलेल्या नागरिकांनी नुकताच यासंदर्भात पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु याची माहिती मिळताच या भागाचे माजी नगरसेवक विनायक गुंजेटकर यांनी स्थानिक लोकांची समजूत काढली. त्याचप्रमाणे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेचे गांभीर्य त्यांच्या कानावर घातले. तेंव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी येत्या दोन-तीन दिवसात सदर ड्रेनेजची पाहणी करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असल्याचे गुंजेटकर यांनी “बेळगाव लाईव्ह”ला सांगितले.
वड्डर गल्ली येथील सदर ड्रेनेज ओव्हर फ्लो होण्याचा प्रकार सद्यस्थितीत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. ड्रेनेज मधील सांडपाणी आणि मैला आदी घाणीमुळे या भागात प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली आहे. या दुर्गंधीमुळे नागरिकांना जेवण-खाण करणे कठीण झाले आहे. येथील लोक सतत आजारी पडत आहेत. तेंव्हा या ड्रेनेजची तात्काळ साफसफाई करून दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे आहे, असेही विनायक गुंजेटकर यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी युसुफ पठाण, मुंजाळकर, वड्डर आदींसह गल्लीतील नागरिक उपस्थित होते.