भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने ललित कला अकादमी, नवी दिल्लीच्या राष्ट्रीय समितीच्या नूतन सदस्यांची निवड केली आहे. ललित कला अकादमीच्या या नूतन सदस्यांमध्ये बेळगावच्या विविध क्षेत्रात आपला डॉक्टरीपेशा सांभाळून कार्य करत असलेल्या भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. सोनाली सरनोबत यांचे वैद्यकीय साहित्य, कला, समाजकार्य, सृजनशीलता, कलाविषयक क्षेत्रातील लेखन, अभ्यास आदी ध्यानात घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.
देशाच्या विविध राज्यातील दहा जणांची ललित कला अकादमीच्या सर्वसाधारण समितीवर निवड करण्यात येत असते. यामध्ये नामवंत शिल्पकार, चित्रकार, माध्यम क्षेत्रातील नामवंत, कलेचे अभ्यासक आणि प्रशासक यांचा समावेश असतो. ललित कला अकादमी ही केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या आधीन असलेली प्रख्यात संस्था आहे. या संस्थेच्या सर्वसाधारण मंडळावर सदस्य म्हणून निवड होणे ही गौरवास्पद बाब समजली जाते. देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य बजावत असलेल्या व्यक्तींची गुणवत्ता, कार्य ध्यानात घेऊन केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय त्यांची ललित कला अकादमीवर नियुक्ती करते. प्रसिद्ध कला दिग्दर्शक भरत दाभोळकर सुद्धा या मंडळावर आहेत.
बेळगाव ही कला आणि संस्कृतीची जोपासना करणारी नगरी आहे. बेळगाव नगरीला कलेचा उज्जवल वारसा लाभलेला आहे. चित्रमहर्षी कै. के.बी. कुलकर्णी, रवी परांजपे, जॉन फर्नांडिस यांच्या सारखे नामवंत चित्रकार बेळगावचेच. अनेक कलात बेळगावातील अनेक व्यक्तींनी आपली नाममुद्रा उमटवली आहे. कलेला आणि कलाकारांना प्रोत्साहन देणे याला मी प्राधान्य देणार असल्याचे डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपल्या निवडीनंतर बोलताना सांगितले. उपरोक्त निवडीबद्दल डॉ सरनोबत यांचे ललित कला अकादमीचे चेअरमन उत्तम पाचरणे यांनी अभिनंदन केले आहे.
डॉ. सोनाली सरनोबत यांची नुकतीच कर्नाटक पशु कल्याण महामंडळावर देखील नेमणुक झाली आहे. आपल्या तत्पर कार्यामुळे व योगदानामुळे त्यांना ही नविन संधी देण्यात आल्याचे समजते. डाॅ. सोनाली सरनोबत यांचे नियती फाऊंडेशनतर्फे चाललेले सामाजिक कार्य सर्वांना सुपरिचित आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने आता ललित कला अकादमी, नवी दिल्लीच्या राष्ट्रीय समितीच्या सदस्यपदी निवड केल्याबद्दल डाॅ. सोनाली सरनोबत यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.