कोरोना सारख्या महामारी मुळे जनता हैराण झाली आहे तर कोरोना रुग्णांसाठी राज्य सरकार व केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात निधी खर्च करत आहेत. मात्र याचा ताळमेळ जिल्हा प्रशासनाने ठेवला नाही. उलट नको ते खर्च दाखवून नागरिकांची दिशाभूल करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खर्च करण्यात आलेल्या पैशांचा हिशोब द्यावा अशी मागणी माजी आमदार फिरोज सेठ यांनी केली आहे.
नुकतीच काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे कोरोना महामारी साठी मोठा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र जिल्हा प्रशासन यामध्ये भ्रष्टाचार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कोरोना रुग्णांसाठी योग्य ती काळजी आणि खबरदारी घेऊन त्यांच्यासाठी आलेला निधी खर्च करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
माजी आमदार फिरोज सेठ यांनी बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यात कोरोनव्हायरस संसर्ग रोखण्यासाठी काय केले जात आहे याची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी अन्यथा रस्त्यावर लढा द्यावा असा इशारा दिला आहे.
रूग्णांसाठी योग्य ते आहार आणि स्यानिटायझर आणि त्यांच्यासाठी योग्य त्या सोयी सुविधा देण्याकडे दुर्लक्ष केले आहे. याचबरोबर डॉक्टरांसाठी जे काही साहित्य खरेदी करण्यात आले आहे त्यामध्येही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे अनेक कोरोना बाधित जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आहेत.
जिल्हा प्रशासनाने आवळ्याचा भोपळा करत पैशांची उलाढाल केली आहे. मोठ्या प्रमाणात त्यांनी पैसे वाया घातले आहेत तर काही ठिकाणी भ्रष्टाचारही झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संपूर्ण हिशोब दाखवावा अशी मागणी त्यांनी केली आहे. हा हिशोब दाखवला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू असा इशाराही त्यांनी दिला आहे.