राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वाहनांखाली सापडून ठार होणाऱ्या मोकाट जनावरे आणि प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी नागरी वसाहतीनजीक राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा बॅरिकेड्स करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या ठोकरीने एक घोडा गंभीर जखमी होऊन मृत्युपंथाला लागल्याची घटना नुकतीच हिरेबागेवाडी येथे घडली आहे. अज्ञात वाहनाच्या ठोकरीने एक घोडा गंभीर जखमी झाल्याची माहिती महामार्गावरील गस्ती पथकाकडून समजताच काकती येथील “हा माझा धर्म” संघटनेच्या विनायक केसरकर यांनी तात्काळ आपला सहकारी राजीव टक्केकर याच्यासह घटनास्थळी धाव घेऊन जखमी घोड्यावर प्राथमिक उपचार केले. तथापि त्या घोड्याचे दुखापत गंभीर असल्याने तो मृत्युपंथाला लागला होता.
राष्ट्रीय महामार्गावर मोकाट जनावरे व प्राणी भरधाव वाहनांखाली सापडून ठार होण्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. विशेषता वाहनांच्या ठोकने मृत्युमुखी पडणाऱ्या मध्ये कुत्र्यांची संख्या जास्त आहे. या पद्धतीने महामार्गावर जाणारे भटक्या प्राण्यांचे बळी रोखण्यासाठी मानवी वसाहतीनजीक महामार्गाच्या दुतर्फा बॅरिकेड करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. तथापि संबंधित खात्याकडून याकडे अद्यापही दुर्लक्ष केले जात असल्याने पशु प्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.