एका कंटेनरमधून विक्रीसाठी नेण्यात येणारे सुमारे 7 लाख रुपये किंमतीच्या तब्बल 7 टन गोमांसासह एकूण 12 लाखाचा मुद्देमाल जिल्हा गुन्हा अन्वेषण विभागाच्या (डीसीआयपी) विशेष पथकाने जप्त केल्याची घटना हुक्केरी – बेळगाव मार्गावर घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना अटक केली असून एक जण फरारी आहे.
रमजान ईलाई शेख व वासिम बाशाभाई कलाल (दोघेही रा. नुरानी गल्ली, सांगली) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर निपाणी येथील एक जण फरारी आहे. याबाबत डीसीआयपी पथकाचे सीपीआय निंगणगौडा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार कंटेनरमधून हे गोमांस गुलबर्गा येथे विक्रीसाठी जात असल्याची माहिती विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांकडून मिळताच डीसीआयपी पथकाने हुक्केरी पोलिसांच्या मदतीने सापळा रचून कारवाई केली. यावेळी 7 टन गोमांस तसेच 5 लाखाचा कंटेनरही जप्त करण्यात आला. पोलीस चौकशीत रमजान व वासिम यांनी निपाणीतील एकाकडून गो मांसाची खरेदी झाली असून ते गुलबर्गा येथे विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचा कबुलीजबाब दिला आहे. हा गुन्हा हुक्केरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
सदर कारवाईत सीबीआय निंगणगौडा पाटील, हुक्केरीचे सीपीआय जी. आय. कल्याणशेट्टी, उपनिरीक्षक एस. बी. गुडगनट्टी, सहाय्यक उपनिरीक्षक डी. के. पाटील, पी. के. कोळची, अर्जुन मसरगुप्पी, सिद्ध मंगन्नावर, एम. आय. पट्टण आदींचा समावेश होता. या कारवाईबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी डीसीआयपी पथकाचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, संकेश्वर महामार्गावरील इस्लामपूरनजीक (ता. हुक्केरी) गो मांसाची वाहतूक करणाऱ्या चौघाजणांना अटक करून त्यांच्याकडील 1.44 लाख रुपये किंमतीचे 800 किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. मंजुनाथ इराप्पा हंचीनमनी (वय 25), दस्तगीर बुड्डेसाब बेपारी ( 28), कालेसाब बुड्डेसाब बेपारी (15) आणि शानुल बुड्डेसाब बेपारी (वय 45) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे असून हे सर्वजण होसवंटमुरी (ता. बेळगाव) येथील रहिवासी आहेत. हे चौघे जण वाहनातून गोमांस यमकनमर्डी येथून गोव्याकडे घेऊन जात होते. याबाबतची माहिती मिळताच सापळा रचून यमकनमर्डी पोलीस स्थानकाचे पीएसआय रमेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी वरील कारवाई केली. याप्रकरणी यमकनमर्डी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.