जागतिक रक्तदाता दिनानिमित्त बीम्स ब्लड बँकेतर्फे शहरातील फेसबुक फ्रेंडस् सर्कलला उत्कृष्ट सेवेचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
लॉक डाऊनच्या काळात शस्त्रक्रिया, डायलेसिस यासाठी तातडीने रक्ताची गरज भासली होती. त्यावेळी फेसबुक फ्रेंडस् सर्कलच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये जाऊन संबंधित रुग्णांसाठी उस्फूर्तपणे रक्तदान केले होते. याशिवाय गेल्या तीन महिन्यात फेसबुक फ्रेंडस् सर्कलतर्फे दोन रक्तदान शिबिरे भरवण्यात येऊन 72 बाटल्या रक्तदान करण्यात आले.
तसेच शिबिरात रक्तदान करणार्या प्रत्येकाला कार्ड देण्यात आले. आपले सर्व उपक्रम विनामूल्य राबविणाऱ्या फेसबुक फ्रेंडस् सर्कलच्या कार्यकर्त्यांनी एखाद्या हॉस्पिटलमधून फोन आल्यानंतर तात्काळ त्याठिकाणी जाऊन रक्तदान केले आहे. त्यामुळे आजवर अनेक रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. गेल्या दोन दिवसात सिव्हील हॉस्पिटलमध्ये असलेल्या दोन रुग्णांना रक्तदान करण्यात आले आहे.
आपल्या वडिलांवरील उपचारासाठी अलीकडेच दोन मुले रक्तदान करण्यासाठी ब्लड बँकेत गेली होती. परंतु संबंधित मुले वयाने लहान असल्यामुळे त्यांना तुम्हाला रक्तदान करता येणार नाही, असे सांगण्यात आले. वडीलांना तातडीने रक्ताची गरज असल्याने संबंधित मुलांनी फेसबुक फ्रेंडस् सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांच्याकडे धाव घेतली.
तेंव्हा त्यांनी लागलीच फेसबुक फ्रेंडस् सर्कलतर्फे त्यांना रक्त उपलब्ध करून दिले. या पद्धतीने फेसबुक फ्रेंडस् सर्कलने रक्तदानाच्या माध्यमातून आत्तापर्यंत अनेकांचे प्राण वाचविले आहेत. या त्यांच्या सेवेची दखल घेऊन बीम्स हॉस्पिटलच्या ब्लड बँकेतर्फे त्यांना उत्कृष्ट सेवेचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.