ढोर गल्ली, वडगांव येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे हा भाग सील डाऊन करण्यात आला आहे. यामुळे स्थानिक लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने संबंधित कोरोनाबाधितांची ते जेथून आले त्याठिकाणी रवानगी केली जावी आणि सील डाऊन मागे घ्यावे, अशी जोरदार मागणी ढोर गल्ली परिसरातील नागरिकांनी केली आहे.
वडगांव भागातील ढोर गल्ली, रयत गल्ली व वड्डर गल्ली येथील नागरिकांनी सदर मागणीचे निवेदन शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. सदर निवेदन सादर करण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ढोर गल्ली वडगांव येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे हा परिसर सील डाऊन करण्यात आला आहे.
या सील डाऊनमुळे स्थानिक लोकांना आपले दैनंदिन व्यवहार करणे कठीण झाले आहे. येथील बर्याच जणांचे हातावर पोट आहे. रोज राबल्याशिवाय त्यांच्या घरातील चूल पेटत नाही. ही वस्तुस्थिती असताना हा परिसर सील डाऊन करण्यात आला असल्यामुळे संबंधित लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ढोर गल्ली भागात आढळून आलेले कोरोना बाधित रुग्ण हे मुंबई-पुण्याहून आलेले आहेत. तेंव्हा त्यांना बेळगावात काॅरन्टाइन न करता त्यांची पुन्हा माघारी पुणे-मुंबई येथे रवानगी करावी आणि ढोर गल्ली परिसरातील सील डाऊन रद्द करावे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करते वेळी वडगांव ढोर गल्ली, रयत गल्ली व वड्डर गल्ली येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.