अंध मुलांना लेखनिकाला सोबत घेऊनच परीक्षा द्यावी लागते. यासाठी आगामी एसएसएलसी परीक्षेप्रसंगी माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेतील 12 परीक्षार्थींना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमातून वगळण्यात येऊन त्यांना एकाच वर्गात परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा अंध सेवा संस्थेने राज्याचे शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांच्याकडे केली आहे.
बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालय येथे बेळगाव जिल्हा अंध सेवा संस्थेचे अध्यक्ष विकास कलघटगी यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन राज्याचे प्राथमिक व माध्यमिक खात्याचे शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांना सादर करण्यात आले. सदर निवेदन स्वीकारून मंत्री सुरेश कुमार यांनी निवेदनातील मागणी तात्काळ मान्य केली तसेच त्यासंदर्भात जिल्हा शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षण अधिकाऱ्यांना संबंधित 12 अंध परीक्षार्थींची एसएसएलसी परीक्षेची व्यवस्था एकाच वर्गात केली जावी. त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी मास्क सॅनीटायझर आदी आवश्यक गोष्टींची व्यवस्था केली जावी, अशी सक्त सूचना केली.
दर वर्षी एसएसएलसी परीक्षेत 100 टक्के निकाल देण्याचा माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेचा गेल्या 32 वर्षांपासूनचा विक्रम आहे. या शाळेतील परीक्षार्थींना परीक्षेतप्रसंगी लेखनिक म्हणून वनिता विद्यालय शाळेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींचे सहाय्य लाभत असते. हे लेखनिक परीक्षार्थीची पेपर लिहिण्यासाठी मदत करत असल्यामुळे त्यांना एकमेका शेजारी बसावे लागते. सध्याच्या कोरोना नियमावलीनुसार सोशल डिस्टन्सिंगमुळे हे शक्य होणार नाही. तेव्हा अंध परीक्षार्थी व त्याच्या लेखनिकाला सोशल डिस्टन्सिंगच्या नियमातून वगळण्यात यावे. तथापी यंदा माहेश्वरी शाळेची 12 मुले एसएसएलसी परीक्षेला बसणार असल्यामुळे या सर्वांची सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार एकाच वर्गात व्यवस्था करणे शक्य होणार आहे. तेंव्हा हा तशी व्यवस्था केली जावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदनातील मागण्यांबाबत विकास कलघटगी आणि नेहरूनगर येथील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता गावडे यांनी शिक्षण मंत्र्यांना माहिती दिली. निवेदन सादर करतेवेळी माहेश्वरी शाळेचा शिक्षक वर्ग उपस्थित होता.