बीएसएनएलच्या उद्यमबाग येथील लँड लाईन दूरध्वनीसह इंटरनेट आदी सर्व सेवा गेल्या कांही महिन्यांपासून बंद असल्यामुळे उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
उद्यमबाग येथे सध्या बीएसएनएलच्या सर्व सेवा ठप्प आहेत. यामुळे येथील उद्योजकांची मोठी गैरसोय होत असून याबद्दल तक्रार करून देखील दखल घेतली जात नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. लॉकडाउनच्या काळात तर बीएसएनएलची लँड लाईन दूरध्वनी सेवा बंद होती. परंतु तरीदेखील ग्राहकांना फोन बिले पाठविण्यात आली असल्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. बिचाऱ्या नागरिकांनीदेखील भविष्यात आपला फोन बंद पडू नये म्हणून निमूटपणे बिलाचे पैसे भरले. लॉक डाऊनमध्ये आपण दूरध्वनी सेवा बंद ठेवल्याने नागरिकांची किती गैरसोय झाली हे लक्षात घेऊन खरे तर बीएसएनएलने नागरिकांना रिफंड द्यावयास हवा, असे बऱ्याच जणांचे मत आहे.
उद्यमबाग हे उत्तर कर्नाटकातील एक मोठी औद्योगिक वसाहत आहे. राज्यासह देशाच्या औद्योगिक क्षेत्रात येथील उद्योजकांचे मोठे योगदान आहे. ही वस्तुस्थिती असताना येथील उद्योजकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत तसेच या औद्योगिक वसाहतीमधील गैरसोयी दूर करून उत्तम रस्ते, गटारी आदी मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या कांही महिन्यापासून येथील लँड लाईन दूरध्वनी बंद असण्याबरोबरच इंटरनेट आदी सेवा व्यवस्थित कार्यरत नाहीत.
परिणामी उद्योजकांची गैरसोय होत आहे. इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर करा, ई वे बिल काढा असे सरकारकडून सांगितले जाते. परंतु त्यासाठी लागणाऱ्या सुविधा कोण उपलब्ध करून देणार? असा उद्यमबाग येथील उद्योजकांचा सवाल आहे. तेंव्हा बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन या ठिकाणची दूरध्वनी सेवा सुरळीत सुरू करण्याबरोबरच अन्य आवश्यक कार्यवाही करावी, अशी उद्यमबाग येथील उद्योजकांची मागणी आहे.