बेळगाव ग्रामीण मतदार संघातील जनता कुरीतल्या दाण्या बरोबर मराठीपण पेरत असते. संघर्ष त्यांना नवा नाही.. निसर्गाशी झुंजता झुंजता कर्नाटक शासनाशी त्यांची लढत चालूच असते. त्यांचा श्वास मराठी आहे, ध्यास मराठी आहे, हव्यास ही मराठीच आहे !
मराठीच्या संघर्षातील लढ्याचा भाग आणि आपले अस्तित्व दाखवण्याचा एक मार्ग म्हणून समिती निवडणुका लढवत असते. पण काहींच्या ओठात एक आणि पोटात एक असते. दुही व्हावी मराठी माणस विखुरली जावीत आणि समितीच्या जीवावर चवली पावलीचा खुर्दा जमा करून इमारतीवर इमारती उभा करणारी काही कर्म दरिद्री लोकं समितीला ग्रामीण भागात अपशकुन करत आहेत.लढणारे एक आणि पंक्ती झोडणारे एक असा प्रपंच ग्रामीण समितीत चालू आहे.
यातील काही जणांच्या बापजाद्यानी आमदारकी भोगली आणि आमदारकी भोगता भोगता आपल्या मुलास राष्ट्रीय पक्षाशी कसं जुळवून घ्यावं.पैश्यांच्या बॅगांची कशी ने आण करावी याचे प्रशिक्षण दिले.मळेकरणीच्या नगरीत वाढलेला हा खेळाडू राष्ट्रीय पक्षा कडून जत्रा खायला सोकावला आहे… बकरं कुणाचेही असुदेत ताट याचे नेहमी पूढेच असते.
समितीच्या काळजाचा भेद घेणारा सुरा याने कायम परजलेलाच आहे. 2008 साली रेस कोर्स वर ग्रामीणचा जुगार खेळून बॅग घेऊन आलेला समिती द्रोही कोण आहे याची ग्रामीण समितीच्या पहिल्या फळीतील नेत्यांना चांगलेच माहिती आहे.रेस कोर्स वर झालेल्या व्यवहारावेळी फोन आल्याचे नाटक करून बाजूला जाण्याचे नियोजन त्याने केले होते, मात्र बॅग त्याने मिळवली.या विमानातून आणलेल्या गाठोड्यातला वाटा कोणकोणत्या नेत्यांना मिळाला याचीही चर्चा तालुक्यात चांगलीच रंगत असते.याचा ताकतुंबा पैसा घेऊन विधीनिषेध न राखता चालूच असतो.
निवडणूक आली की याचे कान खाजवायला सुरू होतात. या स्वयंघोषित नेत्यांचे कारनामे आता उघड होत आहेत.हा ‘पाव शेर’ नेता सगळ्यांच्या चांगल्याच परिचयाचा आहे.राजकीय पक्षाच्या वळचणीच खाऊन समितीचा घात करणारा, एकीचे नाटक करून राष्ट्रीय पक्षा कडून व्यवहाराचा भाव वाढवणारा, राष्ट्रीय पक्षाना एकीची भीती दाखवणारा. समिती मध्ये दुफळी झाल्या पासून व्यवहारात तरबेज झाला आहे.
समितीला ठेच लावणारे हे’ बॅग बहाद्दर’ बाजूला केल्याशिवाय समितीत नव चैतन्य येणार नाही.कार्यकर्ते समितीच्या यशासाठी आसुसलेली आहेत, पण पैश्यासाठी हापापलेले नेते मराठी माणसाचा बळी देत आहेत. अश्या नेत्यानाच हटवण्याची आता गरज निर्माण झाली आहे.युवक त्यासाठी प्रयत्न करणार असून समितीच्या हिताला नख लावणाऱ्या आणि त्या अनुषंगाने राष्ट्रीय पक्षांशी हित संबंध बाळगणाऱ्या ‘खल नायकाला’ खड्या सारखे हुडकून बाजूला करण्याचे ठरवले आहे..सुरे बहाद्दूरानी सावध राहावे हाच युवकांचा त्यांना इशारा आहे.
क्रमशः