बेळगाव तालुक्यात धूळपेरणी झाल्यानंतर हा पाऊस पेरणी झालेल्या पिकांना पोषक ठरला आहे. मात्र अजूनही चाळीस टक्क्यांहून अधिक पेरणीची कामे शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आणखीन काही दिवस पाऊस गेला तर पेरणीची कामे पूर्ण होणार असून मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. खरीप पेरणी नुकतीच काही ठिकाणी झाली आहे तर काही ठिकाणी अजूनही भात व इतर पिकांची पेरणी होणे शिल्लक आहे. पेरणी झालेल्या भात पिकांची तसेच इतर पिकांची उगवण झाली आहे. मात्र आणखी काही दिवस पाऊस गेला तर पेरणी झालेल्या पिकांना आणि शिल्लक राहिलेल्या पेरणीच्या कामांना पोषक वातावरण निर्माण होणार आहे. त्यामुळे पाऊस जाणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत शेतकऱ्यांतून व्यक्त करण्यात येत आहे. पावसाने उघडीप दिली तरच सर्व पिकांना जीवदान मिळणार आहे. अन्यथा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुरुवारी आणि शुक्रवारी काही प्रमाणात पावसाने उघडीप दिली आहे. मागील काही दिवसांपासून दमदार व संततधार पावसाने हजेरी लावली होती. आता हा पाऊस कमी होत आहे. या पावसामुळे नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. जमिनीमध्ये अधिक ओलावा निर्माण झाला आहे. मात्र आता शेतकऱ्यांच्या कामांसाठी पावसाने उघडीप देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. बल्लारी नाल्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले आहे. शिवारातील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे ही पिके वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या पाऊस जाणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी यातून व्यक्त करण्यात येत आहे.
Trending Now
Less than 1 min.
Previous article