कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या विविध समाजातील नागरिकांसाठी सरकारने 5 हजार रुपयांची आर्थिक मदतीची योजना सुरू केली आहे. ही योजना परीट समाजातील फक्त बीपीएल कार्डधारकांसाठी मर्यादित न ठेवता एपीएल कार्डधारकांना देखील त्या योजनेत समाविष्ट केले जावे, अशी जोरदार मागणी परीट समाजातर्फे करण्यात आली आहे.
बेळगाव उत्तर मतदारसंघातील परीट समाजाच्यावतीने सदर मागणीचे निवेदन सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे विविध उद्योगधंदे आणि व्यवसायावर देखील आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे परीट, नाभिक आदी समाजबांधवांची कौटुंबिक परिस्थिती बिकट झाली आहे.
सरकारने यासाठी संबंधित समाजबांधवांना प्रत्येकी 5 हजार रुपये याप्रमाणे आर्थिक मदतीची योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. मात्र ही योजना फक्त बीपीएल कार्डधारकांसाठी मर्यादित आहे. परीट समाजांमधील बहुतांश नागरिक एपीएल कार्डधारक असल्यामुळे त्यांच्यावर हा अन्याय आहे.
या समाजातील एपीएल कार्डधारकांची संख्या देखील अधिक असून त्यांच्यावरही आर्थिक संकट कोसळले आहे. तेंव्हा सरकारने 5 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा योजनेमध्ये परीट समाजातील एपीएल कार्डधारकांना देखील समाविष्ट करावे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.सोमवारी निवेदन सादर करतेवेळी बेळगाव उत्तर मतदारसंघातील बहुसंख्य परीट समाज बांधव उपस्थित होते.