बहुचर्चित दहावीच्या (एसएसएलसी) परीक्षेला आजपासून प्रारंभ झाला. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेसाठी शिक्षण खाते व प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या बाबतीत योग्य ती खबरदारी घेतली असली तरी आज पहिल्या दिवशी पालकांनी मात्र परीक्षा केंद्रांसमोर गर्दी करून सोशल डिस्टंसिंग पार बोजवारा उडविल्याचे पहावयास मिळाले.
जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना दहावीची परीक्षा होणार की नाही? हा संभ्रम निर्माण झाला असताना आज अखेर या परीक्षेला प्रारंभ झाला आहे. ही परीक्षा निर्धोक कोरोना मुक्त पार पडावी यासाठी सार्वजनिक शिक्षण खात्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य खाते आणि पोलीस खात्याच्या मदतीने प्रत्येक परीक्षा केंद्रावर आवश्यक ती खबरदारी घेत उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार शहरातील सर्व परीक्षा केंद्रांमध्ये आज पहिल्या दिवशी अतिशय नियोजनबद्धरीत्या सोशल डिस्टंसिंग, सॅनीटायझेशन, मास्क वितरण, थर्मल स्कॅनिंग आदी आदी कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून परीक्षा घेण्यात आली. परीक्षा केंद्र आवारात सर्व कांही नियोजनबद्धरीत्या पार पडले असले तरी परीक्षा केंद्राबाहेर पालकांनी केलेली गर्दी चिंतेचा विषय ठरली आहे.
दहावी परीक्षेच्या आजच्या पहिल्या दिवशी आपल्या मुलांना परीक्षा केंद्रावर सोडून लगेच माघारी परतण्याऐवजी बऱ्याच पालकांनी केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर सोशल डिस्टंसिंगचा नियम पायदळी तुडवून गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. मुले परीक्षा केंद्रांमध्ये परीक्षेसाठी गेल्यानंतर देखील कांही ठिकाणी पालक मंडळी केंद्राच्या प्रवेशद्वाराबाहेर घोळक्या घोळक्याने चर्चा करत उभी असल्याचे दिसून आले. परिणामी सोशल डिस्टंसिंगचे पालन व्हावे यासाठी पोलीस कर्मचारी पालकांची गर्दी हटविण्यासाठी धडपडताना दिसत होते.
सोशल डिस्टंसिंगचे पालन न करता पालकांनी अशा पद्धतीने गर्दी करणे सुरु ठेवल्यास कोरोनाचा धोका संभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेंव्हा पालकांनी आपल्या मुलांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी अवश्य जावे, परंतु केंद्राबाहेर थांबून राहू नये. मुलाला परीक्षा केंद्रावर सोडल्यानंतर त्यांनी तात्काळ माघारी फिरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, आज परीक्षेचा पहिला दिवस असल्यामुळे मुलांच्या काळजीपोटी तसेच शिक्षण खात्याकडून कोरोनासंदर्भात केलेली उपाययोजना कशी अंमलात आणली जाते हे पाहण्याच्या उत्सुकतेपोटी पालकवर्गाने परीक्षा केंद्राबाहेर गर्दी केल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे कांही पालकांनी कोरोना बद्दलच्या भीतीपोटी आम्ही येथील खबरदारीच्या उपाय योजना पाहण्यासाठी आमच्या मुलांसोबत आलो आहोत, असे सांगितले. तथापि परीक्षा केंद्रांमधील कोरोना संदर्भातील व्यवस्था अतिशय चोख असल्यामुळे आता आमच्या मनातील भीती व दडपण दूर झाले आहे. त्यामुळे आम्ही उद्यापासून परीक्षा केंद्राकडे फिरकणार नसून मुलांना एकटे परीक्षेसाठी पाठवणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे एका पालकाने परीक्षा केंद्राच्या 500 मीटर परिघात पालकांना मुलांसमवेत प्रवेश दिला जाऊ नये अशी सूचना केली आहे. आपण स्वतः उद्यापासून आपल्या मुलाला परीक्षा केंद्रापासून 500 मीटर अंतरावर सोडून माघारी जाणार आहोत. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आपल्या मुलांसह एकंदरीतच सर्वांच्या हितासाठी इतर पालकांनी देखील आपले अनुकरण करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.