बेळगाव शहराचा ऑक्सिजन झोन म्हणून ओळखला जाणारा वॅक्सिन डेपो धोक्यात आहे. येथे झाडे तोडण्यात येत आहेत.
या बेसुमार वृक्षतोडीचे कारण काय आहे हे समजलेले नाही. संध्याकाळी उशिरापर्यंत काम चालू होते हे काम कुणाच्या आदेशावरून सुरू आहे आणि याला परवानगी कुणी दिली याची माहिती मिळाली नाही.बेळगाव जिल्हा वन विभागाने याकडे लक्ष देऊन ही वृक्षतोड थांबवून ती करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
एका माणसाला दिवसभराच्या ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी किमान पाच ते सहा वृक्षांची गरज असते. अश्या वेळी महाकाय असणारे वृक्ष हे ऑक्सिजनचे भंडार, ते नष्ट करणारे कर्म दरिद्री.अश्या लोकांची नीट चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. वनीकरण ,बीजारोपण, वृक्ष लागवड अश्या पद्धतींचे उपक्रम राबवून एका बाजूला वसुधेला हरित करण्याचे प्रयत्न चालू असताना हिरव्यागार बेळगावला वैराण वाळवंटात परावर्तित करण्याचा प्रयत्न करणाऱ्याना शासना बरोबर नागरिकांनीही चाप लावला पाहिजे.
बेळगावकर जनता निसर्गप्रेमी आहे. त्याच बरोबर बेळगावला आंदोलनही काही नवीन नाही “चिपको सारखे आंदोलन” बेळगावात करण्याची गरज निर्माण झाली आहे.चित्रकार महेश होनुले यांनी चित्राच्या माध्यमातून हिरवेगार वॅक्सिंन डेपो जनतेसमोर आणले आणि ही वनराई वाचवण्यासाठी कलात्मक आंदोलन केले. बेळगावच्या संवेदनशील जनतेने आता वॅक्सिंन डेपो बचाव आंदोलनासाठी सज्ज झालं पाहिजे. झाडे वाचली तर माणसं वाचतील हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे.
अनेक वन्य पशु पक्षीं प्राण्यांचे वॅक्सिंन डेपो हे निवासस्थान आहे. असे वन्य जीवींचे निवासस्थान हिरावून घेण्याचा कुणालाही अधिकार नाही.वॅक्सिंन डेपो मधील वनराई नष्ट करणे म्हणजे हिरव्यागार निसर्गसंपन्न बेळगावची ओळख पुसण्यासारखे आहे. याची दखल पर्यावरण प्रेमींनी घेतली पाहिजे.