तपास अधिकाऱ्यांनी चार्जशीट दाखल करण्यास विलंब केल्यामुळे गेल्या फेब्रुवारी महिन्यात देशद्रोही घोषणा दिल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या हुबळी येथील तीन काश्मीरी विद्यार्थ्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.
पुलवामा आत्मघातकी हल्ल्यात शहीद झालेल्या 40 भारतीय जवानांच्या 14 फेब्रुवारी स्मृतिदिनी संबंधित तीन काश्मीरी विद्यार्थ्यांच्या त्रिकुटाने “पाकिस्तान जिंदाबाद”च्या घोषणा दिल्याबद्दल त्यांना अटक झाली होती. यासंदर्भातील चार्जशीट तपास अधिकाऱ्यांनी उशिरा म्हणजे 4 जून रोजी दाखल केल्यामुळे 6 जून रोजी सदर त्रिकुटाला जामीन मंजूर करण्यात आला.
यासंदर्भात तपास अधिकाऱ्यांच्या विरोधात प्राथमिक चौकशीचा आदेश जारी करण्यात आला आहे. हुबळी येथे शिक्षणास आलेल्या काश्मीर येथील संबंधित तीन विद्यार्थ्यांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा व्हिडीओ फेब्रुवारीत व्हायरल झाला होता.
त्याची तात्काळ दखल घेऊन भादवि 124 ए (देशद्रोह) कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. गेल्या मार्चमध्ये स्थानिक न्यायालयाने या विद्यार्थ्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.