बेळगाव तालुक्यातील अनेक रस्ते पहिल्याच पावसात उघडून गेले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोट्यावधी निधी खर्च करूनही पहिल्या पावसात नवीन रस्ता देखील उघडून गेल्याने अनेक ठिकाणी केलेला मोठा भ्रष्टाचार ही पहिल्या पावसातच उघड पडल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील बहुतेक ठिकाणी रस्त्यांचे काम झाले आहे. मात्र पहिल्याच पावसात रस्ते खराब झाल्याने भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे दिसून आले आहे. या प्रकारात विशेष करून लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी आपली पोळी भाजून घेतली आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून नागरिकांना प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे तर काहींत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
या सार्या परिस्थितीत नागरिकांनी मात्र त्रास खावा का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. तालुक्यातील बहुधा गावांमध्ये रस्ते खराब झाल्याने प्रवासातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या अशा परिस्थितीत प्रवास सुखकर करण्यासाठी अधिकारी व सार्वजनिक बांधकाम खाते प्रयत्न करतील का? असा प्रश्नही उद्भवत आहे.
विशेष करून कंग्राळी खुर्द येथील रस्त्याचे वाताहत झाली आहे. या आधी आडमार्गाने जाणार्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने प्रवास कसा करावा हा प्रश्नदेखील साऱ्यांनाच पडला आहे. त्यामुळे तालुक्यातील रस्ते तातडीने दुरुस्त करून नागरिकांची सोय करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.