मागील दोन-तीन महिन्यांपासून एपीएमसी येथील भाजी मार्केट उपनगरातील तीन ठिकाणी हलविण्यात आले आहे. मात्र आता पावसाने सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. अनेक भाजी शेतातच पडून खराब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी एपीएमसी येथेच भाजी मार्केट सुरू करावे अशी मागणी जोर धरून ठेवली आहे.
मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे आणि कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने त्याला स्थगिती दिल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या दोन ते तीन दिवसात एपीएमसी येथे भाजी मार्केट सुरू करण्यासाठी निर्णय होणार आहे. यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पावसाने जोरदार सुरुवात केल्याने अनेक व्यापारी तसेच शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
यासह इतर ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या भाजी मार्केटमध्ये योग्य त्या सुविधा नसल्याने समस्या निर्माण होत आहेत. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचे पत्रे उडण्याची शक्यता आहे तर मागील वेळी झालेल्या जोरदार पावसामुळे पत्रे उडून एका हमालाचा हात जाया झाला होता. याचा विचार करून एपीएमसी प्रशासनाने भाजी मार्केट तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांचा माल शेतात पडून कुजत आहे. मात्र याचे सोयरसुतक प्रशासनाला दिसून येत नाही. याबाबत एपीएमसीचे अध्यक्ष अनंत पाटील यांच्याशी बातचीत केली असता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. त्यांनी सध्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आणखीन दोन दिवस थांबून यावर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे.
याचबरोबर पत्रे उडून जो हमाल जखमी झाला आहे त्याच्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला आहे. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.