अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मान्सूनपूर्व पावसाने कर्नाटक आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हजेरी लावली असून बेळगावात आणखी दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात दाखल झालेले वादळ उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीवर येत्या 3 जून रोजी धडकणार आहे. परिणामी महाराष्ट्राच्या दक्षिण व उत्तर किनारपट्टीच्या भागात 2 जूनपासून 4 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई आणि ठाणे येथेही मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
बेळगाव परिसराला रविवारी दुपारनंतर पावसाने अक्षरशः झोडपून काढल्यामुळे सर्वत्र दाणादाण उडाली होती. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या वादळाचा हा परिणाम आहे.
मुसळधार पावसामुळे काल शहरातील गटारी व नाले तुडुंब भरून वाहत होते शहरातील सखल भागात असणाऱ्या दुकाने व घराघरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले. तासभर पडलेल्या या पावसामुळे बेळगाव महानगरपालिकेच्या नालेसफाई मोहिमेचे पितळ मात्र उघडे पडले. अद्यापही वेळ गेलेली नाही तेंव्हा महापालिकेने शहरातील नाले आणि गटारींची तात्काळ व्यवस्थित साफसफाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.