व्हॅक्सिन डेपो परिसरात सध्या असलेला चेकडॅम धोक्याची घंटा बनला आहे. येथील परिसरातील नागरिक या ठिकाणाहून वारंवार ये-जा करत असतात. या ठिकाणी वर्दळ आहे. जर निकामी झाला तर मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बेळगाव शहरातील टिळकवाडी व्हॅक्सिन डेपो परिसरात असलेला चेक डॅम धोक्याची ठिकाण बनला आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने व्हॅक्सिन डेपो विकास आणि सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामांतर्गत बनविण्यात आलेल्या चेकडॅम मध्ये पार्वती नगर, राणी चन्नमा नगर , गुरूप्रसाद नगर या भागातून फुटलेल्या गटारीतून मोठ्या प्रमाणात सांडपाणी जमा होऊ लागले आहे. व्हॅक्सिन डेपो परिसरात खेळण्यासाठी मोठ्या संख्येने मुले येत असतात. याठिकाणी नागरिकांची येजा असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात चेक डॅम परिसरात साठलेल्या पाण्यामुळे धोका निर्माण झाला आहे. जर पाणी भरून डॅम फुटले तर अनेक नगरे वाहून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
व्हॅक्सिन डेपो चेकडैम परिसरातील संभाव्य धोक्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते विजय शिंगटे यांनी महापालिकेच्या अभियंत्यांना माहिती दिली आहे . मात्र, अद्यापही व्हॅक्सिन डेपो चेकडॅम मध्ये साठत असलेल्या पाण्यासंदर्भात महापालिकेने योग्य ती खबरदारी घेतलेली दिसत नाही. व्हॅक्सीन डेपो परिसरात छोट्या स्वरूपातील सांडपाणी प्रकल्प उभारण्याची विनंती शिंगटे यांनी महापालिकेला केली आहे.
सांडपाणी प्रकल्पामुळे चेक डॅम मधून जर पाण्याचा विसर्ग केल्यास हात धोका दूर होणार आहे. यासाठी महानगरपालिकेने पावले उचलावीत अशी मागणीही करण्यात आली आहे. मात्र महापालिकेने व्हॅक्सिन डेपो चेकडॅम धोक्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल या परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे