दोन महिन्याच्या खंडानंतर आजपासून बेळगाव विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली असली तरी हे विमानतळ पूर्ववत पूर्णक्षमतेने कार्यरत होण्यासाठी किमान 3 – 4 महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी आज सोमवारी सकाळी “बेळगाव लाईव्ह”शी बोलताना दिली.
बेळगावच्या सांबरा विमानतळावरील विमानसेवा आज सोमवारी सकाळपासून सुरू झाली आहे. स्टार एअरलाइन्सचे पहिले विमान आज बेंगलोर होऊन बेळगावात दाखल झाले. यानिमित्त बोलताना विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य पुढे म्हणाले की, कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार आणि नागरी उड्डाण मंत्रालयाच्या निर्देशानुसार एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने आपल्या सर्व विमानतळांवर आवश्यकता त्या खबरदार्या घेतल्या असून या विमानतळावर कोरोना संदर्भातील सर्व नियम व निकषांचे पालन केले जात आहे. बेळगाव विमानतळावरील विमानसेवा आता योग्य ती काळजी घेऊन कायम राहणार आहे. सध्या बेंगळूरचे विमान दाखल झाले आहे. प्रवाशांना कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी थर्मल स्क्रीनींग सारख्या उपाययोजना राबविल्या जात असल्याचे मौर्य यांनी सांगितले.
विमानतळ टर्मिनल इमारतींची कोणत्याही खाजगी वाहनांना परवानगी नसेल. सर्व वाहने पार्किंगच्या जागेत थांबवावी लागतील. विमानतळ इमारतीत सामाजिक अंतराचा नियम पाळून प्रवाशांसाठी आसन व्यवस्था तसेच प्रवाशांच्या आरोग्य तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. विमानतळावर थर्मल स्क्रीनिंग, आरोग्य सेतू अॅप तपासणी, प्रवासी साहित्याचे निर्जंतुकीकरण आणि हाताचे सॅनिटायझेशन यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे. सॅनिटायझेशनसाठी स्थानिक बनावटीचे पीव्हीसी पाईपपासून तयार केलेले स्टॅन्ड आवश्यक ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. विमानतळाच्या इमारतीमध्ये तोंडावर मास्क अनिवार्य असेल. मास्क शिवाय कोणालाही इमारतीत प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक प्रवाशाने आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बेळगाव विमानतळ इमारतीचे वरचेवर निर्जंतुकीकरण केले जात आहे. विमान निर्जंतुकीकरणाची जबाबदारी संबंधित विमान कंपन्यांवर असणार आहे आणि या कंपन्या आपले कर्तव्य व्यवस्थितरीत्या पार पाडत आहेत. कोरोना आणि लॉक डाऊनमुळे अन्य क्षेत्राप्रमाणेच एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला देखील मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. हे नुकसान भरून निघण्यासाठी थोडा कालावधी जावा लागणार आहे. त्याचप्रमाणे बेळगाव विमानतळावरील विमानसेवा पूर्ववत पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी किमान 3 – 4 महिन्याचा कालावधी लागेल, अशी माहिती मौर्य यांनी दिली.
आज सोमवारच्या दिवशी बेळगाव विमानतळावरून बेंगलोर, हैदराबाद व अहमदाबाद या मार्गावरील विमान सेवा सुरू राहणार आहेत. त्याचप्रमाणे म्हैसूर, मुंबई, पुणे आदी विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत असे सांगून बेळगाव विमानतळावरील विमान सेवा सुरू करण्यासाठी आपल्याला बेळगावचे जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांच्यासह आरोग्य खात्याचे आणि बेळगाव महापालिकेचे खूप सहकार्य लाभत असल्याचे राजेशकुमार मौर्य यांनी नमूद केले.