खरीप पेरणी जवळ आली तरी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना सेंद्रिय खताचा पुरवठा होत नसल्याने त्यांच्या कामाचा खोळंबा झाला आहे. तरी सरकारने सेंद्रिय खतांचा त्वरित पुरवठा करावा, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
खरिप पेरणी जवळ येताच शेतकरी आपल्या शेतीची चांगली मशागत करण्याबरोबरच शेणखत तसेच ज्यांना शेणखत मीळत नाही ते सेंद्रिय खताचा वापर करतात. कृषी खात्याकडून मिळणारे सेंद्रिय खत घेऊन खरिप पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना यावेळी सेंद्रिय खतच मिळणे कठिण झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांची खरीप पेरणीची कामे खोळंबली आहेत. सेंद्रिय खतासंदर्भात कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यास सरकारकडूनच अद्याप खताचे वितरण झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत कृषी अधिकारी जिलानी मोकाशी यांच्याशीही संपर्क साधला त्यांच्याकडूनही अद्यापपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे असे कृषी अधिकारी असतीलतर शेतकऱ्यांच्या समस्या कशा सुटणार ? असा सवाल केला जात आहे. कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतातील बांधावर येऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवल्या पाहिजेत, परंतु तसे होतानां दिसत नाही. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी त्वरित लक्ष घालून सेंद्रिय खतांचा पुरवठा करुन खरिप पेरणी करण्यासाठी मार्ग मोकळा करावा, अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी कृषी खात्याच्या वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधला असता कोरोना प्रादुर्भावामुळे सरकारकडून सेंद्रिय खताचा सुरळीत पुरवठा होण्यात अडचणी येत आहेत. परिस्थिती पूर्ववत झाल्यावर सूरळीत केले जाईल, असे सांगण्यात आले होते. तेंव्हा आता सर्व व्यवहार सुरळीत सूरु झाले असताना खताचा पूरवठा का होत नाही ? असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे. कृषिमंत्री बी.सी.पाटील यांनी शेतकऱ्यांना खत, बियाणं तसेच अन्य कशाची कमतरता भासल्यास माझ्याशी थेट संपर्क साधा असे सांगितले आहे. त्यामुळे शेतकरी आता त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.