मुचंडी (ता. बेळगाव) गावातील एका दुकानाला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. दुकानाला लागुनच घर असल्यामुळे या दुर्घटनेत सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.
श्री सिद्धेश्वरनगर, मुचंडी येथील सदर दुर्घटनाग्रस्त किराणा मालाचे दुकान आणि घर बसवानी निगड्डीअप्पा चौगुले यांच्या मालकीचे आहे. या दुर्घटनेत बसवानी चौगुले यांची सर्व मिळकत आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे चौगुले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बसवानी यांनी अलीकडेच आपल्या दुकानात विक्रीसाठी तेल, अन्नधान्य आदी जीवनावश्यक साहित्याच्या साठा करून ठेवला होता. त्याचप्रमाणे जी कांही रोख रक्कम होती ती देखील त्यांनी आपल्या दुकानातील ट्रेझरीमध्ये मध्ये ठेवली होती. आज रविवारी पहाटेच्या सुमारास दुकानातून धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्याने आगीचा प्रकार उघडकीस आला. दुकानाला लागलेली आग इतकी भीषण होती की त्यामध्ये दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. त्याचप्रमाणे बसवानी यांची मोटरसायकल देखील बेचिराख झाली.
चौगुले कुटुंबियांच्या अंदाजानुसार सदर आग शॉर्टसर्किटने लागली असावी. परंतु गावकऱ्यांमध्ये हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चौगुले यांचे दुकान आगीच्या भक्षस्थानी पडण्यामागे गावातील विघ्नसंतोषी लोकांचा हात असल्याचे बोलले जात आहे. कारण शनिवारी रात्री 12 वाजेपर्यंत चौगुले कुटुंब जागे होते, त्यानंतर सर्वजण झोपी गेले. मध्यरात्री 1.30 सुमारास दुकानाला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. गावकर्यांच्या मते विघ्नसंतोषी लोकांनी दुकानातसमोर उभी केलेली मोटरसायकल पेटवून दिल्यामुळे आग प्रथम दुकानांमध्ये आणि त्यानंतर घरामध्ये पसरली.
सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने रात्री 2 वाजता घटनास्थळी धाव घेऊन तीन तासाच्या महत्प्रयासानंतर आज रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणली. याप्रसंगी अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून चौगुले यांच्या घरातील एलपीजी गॅस सिलेंडर सुखरूप बाहेर काढल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या दुर्घटनेत बसवानी चौगुले यांचे सुमारे 15 लाखाचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची नोंद मारीहाळ पोलीस स्थानकात झाली असून पोलीस तपास जारी आहे.