कोरोना विरुद्धच्या लढ्यातील फ्रन्टलाइन वॉरियर्स पैकी एक असणाऱ्या पत्रकारांना राज्य शासनाकडून मदतीचे विशेष आर्थिक पॅकेज दिले जावे अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली असून पत्रकारांना हे पॅकेज निश्चितपणे मिळेल, असा विश्वास बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी व्यक्त केला आहे.
बेळगावात 23 दिवसानंतर पुन्हा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीसह कोरोना विरुद्धच्या लढ्यात फ्रंटलाईन वॉरियर्समध्ये असलेल्या पत्रकारांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्यासंदर्भात “बेळगाव लाईव्ह”ने घेतलेल्या मुलाखतीप्रसंगी आमदार अॅड. अनिल बेनके यांनी उपरोक्त विश्वास व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, बेळगाव शहरात पुन्हा नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळून येऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असताना दुर्दैवाने सदाशिवनगर येथील एक महिला कोरोना बाधित आढळून आली आहे. तथापि सदर महिला ही स्थानिक नसून ती मुंबईहून बेळगावला आलेली आहे, तेंव्हा शहरवासीयांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र यावरून हे सिद्ध होते की कोणत्याही परिस्थितीत अशा घटना घडू शकतात. अशाप्रकारे कोरोना आपल्या दारापर्यंत केंव्हाही येऊ शकतो. यासाठी शहरवासीयांनी सावध राहून कोरोनाला दूर ठेवण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचना आणि खबरदारीच्या उपायांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन आमदार बेनके यांनी केले.
कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊन यामुळे अन्य घटकांप्रमाणेच पत्रकारांना देखील सध्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लॉक डाऊनचा प्रतिकूल परिणाम वृत्तपत्र व्यवसाय आणि आणि अन्य प्रसिद्धी माध्यमांवर देखील झाला आहे. या क्षेत्रामध्ये मनुष्यबळाची कपात करण्याबरोबरच पगारामध्ये देखील कपात केली जात आहे. या पद्धतीने पत्रकारितेच्या क्षेत्रातील मंडळींवर ओढवलेले संकट लक्षात घेऊन मी कालच माननीय मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना एक पत्र वजा निवेदन पाठविले आहे. या निवेदनाद्वारे पत्रकारांसाठी विशेष करून उत्तर कर्नाटकातील पत्रकारांसाठी सरकारकडून विशेष आर्थिक पॅकेज देण्याची मागणी केली आहे, असे आमदार बेनके यांनी सांगितले. त्याचप्रमाणे येत्या दोन-तीन दिवसात आपण स्वतः बेंगलोरला जाणार आहोत. त्यावेळी अन्य आमदारांना सोबत घेऊन आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मागणीचा पुनरुच्चार करणार आहे. राज्य सरकार पत्रकारांसाठी विशेष पॅकेज निश्चितपणे मंजूर करणार असा आपला ठाम विश्वास असल्याचेही आमदार अॅड. अनिल बेनके यांनी स्पष्ट केले.
लॉक डाऊनच्या काळात प्रारंभापासूनच शहरातील कोणीही उपाशी राहणार नाही यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगून त्यासाठी आपण राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती आमदार बेनके यांनी यावेळी दिली.