बी. के. कंग्राळी औद्योगिक वसाहतीतील रफिया पॉलीमर्स प्रा. लि. ही कंपनी अचानक बंद करण्यात आली असून यामुळे बेकारीची कुऱ्हाड कोसळलेल्या सुमारे 40 कामगारांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
कोणतीही पूर्वसूचना न देता लॉक डाऊन आणि आर्थिक संकटाचे कारण पुढे करून रफिया पॉलीमर्स प्रा. लि. कंपनी अचानक बंद करण्यात आल्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे. तेंव्हा आमचा प्रलंबित पगार देण्याबरोबरच आम्हाला पुनश्च कामावर घेतले जावे, अशी मागणी सदर कंपनीच्या कामगाराने गुरुवारी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. लॉक डाऊन काळात सर्वच उद्योगधंदे बंद पडले, मात्र केंद्र सरकारने उद्योजकांना आपल्या कामगारांचे पगार द्यावेच लागतील असे सांगितले आहे. तथापि रफिया पॉलीमर्स कंपनीने अचानक आपले काम थांबविले आहे. त्यामुळे गेली 30 वर्षे या कंपनीत प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या सुमारे 40 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कंपनी अचानक बंद करण्यात आल्यामुळे रस्त्यावर आलेल्या या कामगारांच्या कुटुंबीयांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कामगारांचे गेल्या दोन महिन्यापासून पगार ही देण्यात आलेले नाहीत. तेंव्हा या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा. प्रलंबित पगार मिळवून देण्याबरोबरच आम्हाला नोकरीत पुन्हा रुजू करण्याची व्यवस्था केली जावी, अशा आशयाचा तपशील संबंधित कामगार आणि सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.
मारुती मोरे या कामगाराने प्रसारमाध्यमांसमोर रफीयाच्या कामगारवर्गाची कैफियत मांडली. आमचा दोन महिन्याचा पगार देण्यात आलेला नाही त्याचप्रमाणे कंपनी अचानक बंद करण्यात आल्यामुळे आम्ही ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा. कंपनी नुकसानीत चालत असल्यामुळे बंद करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात आतून कंपनीचे काम सुरूच आहे, असा आरोप मोरे यांनी केला. यासंदर्भात आम्ही कामगार आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्याचप्रमाणे आता जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून न्याय मागितला असल्याचे मारुती मोरे यांनी सांगितले. याप्रसंगी डी. एम. पाटील, एच डी. हसणे, पी. जी. पाटील आदींसह रफिया पॉलीमर्स प्रा. लि. सर्व कामगार उपस्थित होते.
दरम्यान, संचालक अमित बागरी यांच्या स्वाक्षरीसह रफिया पॉलीमर्सकडून कामगारांना देण्यात आलेल्या नोटीसमध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे कंपनीवर आर्थिक संकट कोसळले आहे, लॉक डाऊनमुळे सीमा बंद असल्यामुळे उत्पादनासाठी आवश्यक साहित्य पुरवठा बंद झाला आहे. कंपनीतील उत्पादन पुन्हा सुरू केल्यास काम करताना कामगारांकडून सोशल डिस्टन्सिगचा नियम पाळला जाऊ शकणार नाही आदी कारणे नमूद करण्यात आली असून त्यामुळे कंपनीत बंद करावी लागत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.