शहरातील पांगुळ गल्ली ही आझाद गल्ली कंटेनमेंट झोनमध्ये येत असली तरी येथील या गल्लीचा रस्ता दोन्ही बाजूने सीलबंद करण्यात आल्यामुळे जीवनावश्यक सेवेविना नागरिकांचे हाल होत आहेत. तेंव्हा प्रशासनाने एक तर याठिकाणी ये – जा करण्यासाठी पुरेसा मार्ग खुला करून द्यावा अथवा आझाद गल्लीचे कंटेन्मेट क्षेत्र हे सदाशिवनगर कंटेन्मेट क्षेत्राप्रमाणे 100 मीटरचे करावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
आझाद गल्ली येथे कोरोना बाधित महिला रुग्ण आढळल्यानंतर येथील 200 मी. परिघातील परिसर कंटेनमेंट झोन अर्थात निर्बंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या निर्बंधित क्षेत्रांमध्ये पांगुळ गल्लीचा ही समावेश आहे. तथापि पांगुळ गल्ली येथील रस्ता दोन्ही बाजूने सीलबंद करण्यात आल्यामुळे येथील नागरिकांचे हाल होत आहेत. रस्ताच बंद असल्यामुळे याठिकाणी प्रशासनाकडून राबविली जाणारी जीवनावश्यक सेवेची कोणतीही यंत्रणा गेल्या 24-25 दिवसात पोहोचलेली नाही. इतके दिवस याठिकाणी जे बॅरिकेड्स टाकण्यात आले होते त्यातून पायी ये-जा करण्यापुरती वाट असल्यामुळे नागरिकांना बाहेर जाऊन जीवनावश्यक साहित्याची खरेदी करता येत होती.
पोलिसांनी काल गुरुवारी सायंकाळी या ठिकाणचे एका बाजूचे बॅरिकेड्स हटवून ते आझाद गल्ली नजीकच्या भेंडीबाजार कॉर्नरच्या ठिकाणी नेऊन घातले होते. त्यामुळे आज शुक्रवार सकाळपासून या ठिकाणची दुकाने सुरू झाली होती. नागरिकही जीवनावश्यक साहित्यासाठी खरेदी करत होते. मात्र दुपारी अचानक महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी याठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी पोलिसांनी हटवलेले बॅरिकेड्स पुन्हा पूर्वीच्या जागी बसविले. आता एका बाजूला मारुती मंदिराच्या ठिकाणी आणि दुसऱ्या बाजूला गणपत गल्ली कार्तिका सारिजनजीक बॅरिकेड्स घालून दोन्ही बाजूने पांगुळ गल्ली बंदीस्त करण्यात आली आहे. याठिकाणी पायी चालत जाण्यासाठी साधी फटही ठेवण्यात आली नसल्यामुळे नागरिकांची कोंडी झाली आहे. जीवनावश्यक साहित्यासह भाजीपाला, दूध वगैरे गोष्टी आता कशा आणायच्या? असा यक्षप्रश्न त्यांना पडला आहे. तेंव्हा जिल्हा प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन पांगुळ गल्ली येथील नागरिकांना दिलासा देण्याची जोरदार मागणी होत आहे.
*हा दुजाभाव कशासाठी*
सदाशिवनगर येथे नुकतीच एक कोरोनाबाधित महिला रुग्ण आढळल्यानंतर तो भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. मात्र हे करताना या निर्बंधित क्षेत्राचे परीघ मात्र 200 मी. ऐवजी 100 मी. इतके कमी ठेवण्यात आले आहे. नियम जर लागूच करायचा असेल तर सदाशिनगर येथील निर्बंधित क्षेत्र देखील आझाद गल्ली प्रमाणे 200 मीटरचे असायला हवे.
तसेच जर सदाशिनगर निर्बंधित क्षेत्र 100 मीटरचे होऊ शकते तर आझाद गल्ली येथील क्षेत्र 100 मीटरचे का होऊ शकत नाही? असा सवाल पांगुळ गल्लीवासियांकडून केला जात आहे. त्याचप्रमाणे सदाशिवनगर येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांचे निवासस्थान असल्यामुळे कोरोनाचे गांभीर्य लक्षात न घेता हा दुजाभाव केला जात असल्याचा आरोपही केला जात आहे.