बेळगाव जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आल्यामुळे कंटेनमेंट झोन वगळता अन्य ठिकाणचे व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी प्रशासनावर ताण पडू नये यासाठी रविवार पेठेतील व्यापार्यांनी आदर्शवत संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रविवार पेठेत अवास्तव गर्दी होऊ नये, सोशल डिस्टनसिंगचे पालन केले जावे, यासाठी येथील व्यापाऱ्यांनी स्वखर्चाने खाजगी सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून याबद्दल प्रशंसोद्गार काढले जात आहेत.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज झोनमध्ये असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन वगळता अन्य क्षेत्रातील दैनंदिन व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बेळगावातील रविवार पेठ येथील होलसेल बाजारपेठ देखील सोमवार 4 एप्रिलपासून सुरू झाली आहे. लॉक डाऊनच्या काळात बंद ठेवण्यात आलेली सदर बाजार पेठ मध्यंतरी खुली ठेवण्यात आली होती, परंतु या ना त्या कारणास्तव पुन्हा ती बंद करण्यात आली होती.
त्या वेळेचा अनुभव लक्षात घेऊन रविवार पेठेतील व्यापार्यांनी यावेळी पोलीस खात्याशी चर्चा करून आपल्या भागात खाजगी सुरक्षा व्यवस्थेची संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव आणि लोक डाऊन यामुळे याआधीच जिल्हा प्रशासनासह पोलीस खात्यावर मोठा ताण पडला आहे. हे लक्षात घेऊन रविवार पेठेतील व्यापार्यांनी आपला भाग कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी खाजगी सुरक्षा व्यवस्था कैनात करण्याची संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे.
यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या रविवार पेठच्या दिशेने जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर हायटेक सुरक्षा कंपनीची सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. रविवार पेठेत जाणार्या प्रमुख मार्गांवर तैनात असणाऱ्या खाजगी सुरक्षा रक्षकांकडून दुचाकी, तिचाकी आणि चारचाकी वाहनांना रविवार पेठेत प्रवेश करण्यास मज्जाव केला जात आहे. नरगुंदकर भावे चौक, कलमठ रोड अर्बन बँक आदी ठिकाणी सदर सुरक्षारक्षक काटेकोरपणे आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे सदर सुरक्षारक्षक फक्त वाहने अडवत नसून रविवार पेठेतील दुकानांसमोर नागरिकांकडून सोशल डिस्टन्ससिंगचे पालन होत आहे की नाही याकडे ही बारीक लक्ष देत आहेत. लॉक डाऊन काळातील पूर्वानुभव लक्षात घेऊन रविवार पेठेतील व्यापाऱ्यांनी खाजगी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचा ही जी संकल्पना राबविली आहे त्याची जाणकारांमध्ये प्रशंसा होताना दिसत आहे.