बेळगाव शहरातील परिवहन महामंडळाने तब्बल 50 दिवसांहून अधिक काळानंतर बस सेवेला सुरुवात केली. मात्र याला थंडा प्रतिसाद मिळत असल्याने बस चालक व वाहक कुणी प्रवासी देता का प्रवासी असे हाक मारण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
त्यामुळे एकीकडे प्रवासी मिळेनासे झाले आहेत तर काही ठिकाणी प्रवासी थांबून परत घरी जाण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे योग्य नियोजन आणि योग्य ठिकाणी बस सोडण्याची गरजही व्यक्त होऊ लागली आहे. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याने बस सेवेला प्रारंभ झाला आहे.
मात्र कोरोनाच्या भीतीमुळे अनेक जण घरातून बाहेर पडणे टाळत आहेत. अशा परिस्थितीत बस चालक आणि वाहकांना बस स्थानकावर बसून प्रवाशांची प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रवाशांची संख्या फारच कमी दिसून येत आहे. काही ठिकाणी बस थांबत नाही तर काही ठिकाणी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत रस्त्यांची कामे सुरू असल्याने संबंधित ठिकाणी बसला जाण्यासाठी वळसा घालून जावे लागत आहे. अशा सार्या प्रसंगातून परिवहन महामंडळ आपला मार्ग शोधत आहे. मात्र प्रवाशांनी याकडे अत्यल्प प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लॉक डाऊन संपल्यानंतर काही प्रमाणात प्रवासी मिळतील अशी आशाही परिवहन महामंडळला लागून राहिले आहे.
सध्यातरी बेळगाव शहर आणि परिसरात नागरिक बसमधून प्रवास करण्यास धाडस दाखवत नसल्याचे दिसून येत आहे. याचबरोबर ग्रामीण भागातही अशीच अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे किमान पंचवीस प्रवासी बसमध्ये असल्यास बस सोडणे सोयीस्कर ठरणार आहे. सध्या परिवहन महामंडळाला लाखोंचा फटका बसला आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.