महाराष्ट्रातील कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी सामाजिक बांधिलकीतून बेळगावच्या नारायण जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठान शहापूर यांच्यातर्फे महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यता निधीला उस्फुर्त देणगी देण्यात आली.
शहापूर येथील नारायण जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानातर्फे नुकत्याच आयोजित कार्यक्रमांमध्ये सदर देणगीचा धनादेश चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी महापौर मालोजीराव अष्टेकर उपाध्यक्ष नेताजी जाधव व सेक्रेटरी व्ही. एस. जाधव (गुरुजी) यांच्या हस्ते सदर धनादेश स्वीकारून आमदार राजेश पाटील यांनी प्रतिष्ठानचे आभार मानले. दिवसागणिक महाराष्ट्रातील मुख्यत्वेकरुन मुंबई येथील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.
कोरोनाचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि प्रशासकीय यंत्रणा दिवस-रात्र झटत आहे. त्याचवेळी बाधितांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी बराच मोठा खर्च येणार आहे. यासाठी सेवाभावी संस्था दानशूर व्यक्ती उद्योजक आणि नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. नारायण जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानने देखील याकामी पुढाकार घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यता निधीला उस्फुर्त देणगी देण्याद्वारे सामाजिक बांधिलकी जोपासल्या बद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे गौरवोद्गार आमदार राजेश पाटील यांनी यावेळी काढले.
प्रारंभी व्ही. एस. जाधव यांनी प्रास्ताविक केले. तत्पूर्वी उपाध्यक्ष नेताजी जाधव व श्रीधर जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले. याप्रसंगी बाबासाहेब शिंदे, माजी उपमहापौर कल्लाप्पा प्रधान, युवराज जाधव, पूजा जाधव, साईराज जाधव, सुमंत जाधव, ओवी जाधव आदी उपस्थित होते.