बेंगळूर विकास प्राधिकरण ने वृत्तपत्रात एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. नेत्यांनी नेतृत्व केलेल्या संस्थांनी लिझवर घेतलेल्या जागा किंवा इमारतींचे भाडेच न भरल्याचे ही जाहिरात सांगत आहे. एकूण 150 कोटींची थकबाकी असून 15 दिवसात भरा असा इशारा या जाहिरातीच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
थकबाकीदार संस्थांच्या यादीत बेळगावचे राज्यसभा सदस्य खासदार प्रभाकर कोरे आणि माजी आमदार संजय पाटील यांच्या संस्थांचाही समावेश आहे. बेळगावच्या राजकारणी व्यक्तींनी बेंगळूर सारख्या शहरातही आपली प्रतिमा आणि नेतेगिरी राखून ठेवल्याचे हे पुराव्यासह उदाहरण बेळगाव live च्या हाती लागले आहे.
पहिल्यांदाच राज्य सरकारच्या एकाद्या खात्याने राजकीय व्यक्ती आणि त्यांच्या नेतृत्वात चालवल्या जाणाऱ्या संस्थांना असा दणका दिला आहे. सार्वजनिक मालमत्ता ताब्यात घेऊन त्यावर संस्था चालवत असताना ठरलेले भाडेही हे नेते देत नाहीत हेच यावरून स्पष्ट झाले आहे.
एकूण थकबाकीदार संस्था या कर्नाटकात मोठ्या संख्येने असलेल्या वक्कलीग समाजाच्या आहेत. तसेच भाजप चे राजकीय नेते प्रभाकर कोरे, संजय पाटील आणि डॉ एम आर दोरेस्वामी यांच्यासारख्या बड्या व्यक्तींच्या असल्याचेही या जाहिरातीमधून उघड झाले आहे.
राज्य वक्कलीग संघ, कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी, गोमटेश विद्यापीठ, पीपल एज्युकेशन सोसायटी, ओक्सफोर्ड इंग्लिश स्कुल अशी त्या संस्थांची नावे आहेत. आपल्या शिक्षण संस्थेत सामान्य विद्यार्थ्यांना प्रवेश देताना कोणतीच दयामाया या संस्था दाखवत नाहीत. पण कमावलेल्या पैशातून सरकारी भाडे सुद्धा भरत नाहीत, हे गंभीर चित्र पाहायला मिळते.
बेंगळूर विकास प्राधिकरणाने शुक्रवारी जाहिरात प्रसिद्ध करून यापैकी 34 मोठ्या थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध केली आहेत. ही शेवटची सूचना असेल असे एक अधिकारी म्हणाला. जर 15 दिवसात पैसे भरले नाहीत तर बिडीए कायदा 1989 च्या कलम 10(3) व कलम 10(12) अन्वये कारवाई म्हणून संबंधित जागा इमारतीसह ताब्यात घेतल्या जाणार आहेत.
थकबाकी असणाऱ्या संस्था आणि रक्कम पुढीलप्रमाणे
1. राज्य वक्कलीग संघ- 812763032 रुपये
2. पीपल एज्युकेशन सोसायटी- 158418633 रुपये
3. गोमटेश विद्यापीठ- 149148729 रुपये
4.ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कुल- 43228911 रुपये
5. कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी 1315694 रुपये
व इतर यादी 34 जणांची आहे.